कोणत्याही क्षेत्रात जा, समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवा – ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी
विधानभवन येथे 51 वा संसदीय अभ्यासवर्ग
नागपूर, दि. १2 : संसदीय अभ्यासवर्गातून विद्यार्थ्यांना संसदीय लोकशाहीची ओळख होते. सभागृहाचे कामकाज जवळून पाहण्याची संधी मिळते. अभ्यासवर्गातील युवकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. भविष्यात तुम्ही कुठेही जा, कोणतेही क्षेत्र निवडा परंतू काम करतांना आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवा, असे जेष्ठ पत्रकार तथा राज्य अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनी केले.
विधानभवन येथे 51 व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘प्रसार माध्यमे : विधिमंडळ आणि सामान्य नागरिकांमधील महत्वपुर्ण दुवा व त्याअनुषंगाने त्यांची भुमिका व जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन करतांना श्री.जोशी बोलत होते. यावेळी विधानमंडळाच्या सचिव मेघना तळेकर, विधानभवनचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते.
विधानमंडळाच्या कामकाजाचे वृत्ताकंन करतांना वंचित, शेवटच्या माणसासाठी चार गोष्टी सभागृहात होतात की नाही, हे मी प्राधान्याने पाहतो आणि त्यादृष्टीने वृत्तांकन करण्याचा प्रयत्न करतो. जनतेचे अहीत करणाऱ्यांना उघडे पाडण्याची माझी भूमिका असते. हे करत असतांना सौम्य भाषेत परंतू संबंधितास त्याच्या चूका निदर्शनास आणून देणारी माझी बातमी असते, असे पुढे बोलतांना श्री.जोशी म्हणाले.
पत्रकाराने तटस्थ राहून पत्रकारीता केली पाहिजे. पत्रकारीतेला आज मी न्याय दिला की नाही हे मी रोज पाहतो. पत्रकारीता वैयक्तीक लाभासाठी नाही, अशा गोष्टी पत्रकारांनी टाळल्या पाहिजेत. स्वत:च्या लाभासाठी मला पत्रकारीता मिळाली नाही, याची जाणीव पत्रकारांनी ठेवली पाहिजे. तुम्ही पत्रकारीतेत येणार असाल तर काही पथ्य पाळा, पत्रकारीतेच्या ग्लॅमरस जगतात भुलू नका. कष्ट आणि मेहनतीची तयारी असेल तरच पत्रकारीतेत या, असे अभ्यासवर्गातील विद्यार्थ्यांना पत्रकारीतेबद्दल सांगतांना श्री.जोशी म्हणाले.
अलिकडे आपण वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवमुल्यन होत असल्याचे पाहतो. समाजात काही ‘ऑथोरिटीज’ आहेत. वि.वा शिरवाडकरांसारखे ऑथोरिटीज समाजाचे मार्गदर्शन करत असत. अशा मार्गदर्शकांमुळे समाजाला दिशा मिळते. भविष्यात आपण अशा ऑथोरिटीज होऊ शकू का? तसा प्रयत्न करा. पत्रकारीता शासन आणि समाज यांच्यातील दुवा आहे. त्यामुळे बातमीची वस्तुस्थिती, विश्वासार्हता कायम महत्वाची असते. अलिकडे प्रिंट मीडीयाला इलेक्टॅानिक मीडीयाचे आव्हान असल्याचे देखील श्री.जोशी यांनी सांगितले.
सुरुवातीस सचिव मेघना तळेकर यांनी यदु जोशी यांचे स्वागत केले तर जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी परिचय करून दिला.




