मकरसंक्रांतीपूर्वी प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात कठोर कारवाईचे संकेत; पोअ. श्री. निलेश तांबे यांचे नागरिकांना आवाहन

Advertisement

आगामी मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्याच्या उत्साहात नागरिकांनी शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन, चायनीज व रासायनिक पदार्थ मिश्रित मांजाचा वापर करू नये, असे कळकळीचे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी केले आहे. अशा हानीकारक मांजामुळे यापूर्वी मानवी मृत्यू, गंभीर दुखापती, पक्ष्यांना इजा व मृत्यू तसेच पर्यावरणाची मोठी हानी झाल्याच्या घटना घडल्या असून शासनाने या प्रकारच्या मांजावर पूर्णतः बंदी घातलेली आहे.

पतंग उडविण्याच्या स्पर्धांमध्ये तरुणांसह लहान मुलांकडूनही प्रतिबंधित मांजाचा वापर होत असल्याचे आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी विशेष दक्षता घेऊन मुलांवर लक्ष ठेवावे, विजेच्या तारांजवळ किंवा धोकादायक ठिकाणी पतंग उडवू नयेत, तसेच मानव, पशु-पक्षी यांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी, असेही पोलीस अधीक्षकांनी नमूद केले आहे.

Advertisement

जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व पोलीस ठाण्यांच्या विशेष पथकांद्वारे आगामी काळात प्रतिबंधित मांजाची साठवणूक, विक्री व वाहतूक करणाऱ्यांचा शोध घेण्यात येणार असून, असा मांजा आढळून आल्यास संबंधितांवर भारतीय न्याय संहिता व इतर लागू कायद्यांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी शासनाने प्रतिबंधित केलेल्या मांजाबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Subscribe to Viral News Live