भरदिवसा घरफोडी; चाकूचा धाक, स्प्रे मारून दरोडा — गुन्हेगारांना शिक्षा देण्याची मागणी

Advertisement


चिखली | प्रतिनिधी : तालुक्यातील धोत्रा नाईक येथे दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवत व अंगावर स्प्रे मारून अज्ञातांनी घरावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना धोत्रा नाईक येथे २७ ऑक्टोंबर रोजी १२:३० च्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी ३ नोव्हेंबर रोजी अमडापूर पो.स्टे.ला निवेदन देवून करण्यात आली आहे.
मनोज वामन पानगोळे रा. धोत्रा नाईक यांनी या संदर्भात ३ नोव्हेंबर रोजी अमडापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, २७ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता तीन अज्ञात व्यक्ती एका दुचाकीवरून आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. घरातील लहान भावजय घरी असताना त्यांनी तिच्यावर आणि घरातील कुत्र्यावर स्प्रे मारून घरात प्रवेश केला.
त्यानंतर कपाटातील रु. ७०,००० रोख रक्कम, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी,१ चांदीचे ब्रेसलेट,आणि सुमारे ५ ग्रॅम सोन्याची पोथ असा मिळून जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरी दरम्यान भावजयच्या उजव्या हातावर दांड्याने मारहाण करण्यात आली तसेच चाकूचा धाक दाखवून “तुमच्या घराला चांगली अद्दल घडवू” अशी धमकी देण्यात आली.विशेष म्हणजे, पानगोळे यांच्या घरात सन २०२२-२३ मध्येही अशाच प्रकारे पावडर टाकून चोरी झाली होती. पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा प्रकार घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची चौकशी करून आरोपींचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पानगोडे यांच्याकडून करण्यात आली आहे.

Subscribe to Viral News Live