बुलढाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत विदेशी दारू व चारचाकी वाहन असा एकूण 3 लाख 56 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध देशी, विदेशी तसेच हातभट्टी दारूची साठवणूक, वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बुलढाणा यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथके तयार करून कारवाईसाठी सज्ज ठेवण्यात आले होते.
दि. 15 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम चारचाकी वाहनातून विनापरवाना विदेशी दारूची चोरटी वाहतूक करत बुलढाणा शहरातील धाड नाका येथून सर्कुलर रोडमार्गे चिंचोले चौकाकडे येत आहे. या माहितीवरून पथकाने चिंचोले चौक येथे नाकाबंदी केली असता, संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान सचिन समाधान रिंढे (वय 31, रा. शेलसुर, ता. चिखली, जि. बुलढाणा) हा आरोपी चारचाकी वाहनात विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आला. आरोपीकडून विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या, ज्यांची किंमत 56 हजार 410 रुपये आहे, तसेच मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची एस-प्रेसो कार (किंमत अंदाजे 3 लाख रुपये) असा एकूण 3 लाख 56 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव), अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस हवालदार दीपक लेकुरवाळे, शेख चांद, पोलीस नाईक अनंता फरताळे, सुनील मिसाळ आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल आशा मोरे यांचा समावेश होता.





