जळगाव | हेमोफेलिया या दुर्मिळ पण गंभीर रक्तविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचे जीव सध्या अक्षरशः टांगणीला लागले आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक असलेल्या फॅक्टर इंजेक्शनचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, त्यामुळे शेकडो हेमोफेलिया रुग्णांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे.
हेमोफेलिया हा रक्त गोठण्याशी संबंधित आजार असून, रुग्णांना किरकोळ जखमेतूनही मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत फॅक्टर इंजेक्शन हेच रुग्णांसाठी जीवनरक्षक औषध ठरते. मात्र सध्या दीर्घकाळ परिणामकारक ठरणारे हे इंजेक्शन वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्ण उपचारांपासून वंचित राहात आहेत.
दरम्यान, हेमोफेलिया सोसायटी धुळेचे सचिव स्वप्नील पाटील यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून धुळे, जळगाव व नंदुरबार येथे हेमोफेलिया सेंटर सुरू करून घेतले. मात्र सेंटर सुरू झाले असले तरी औषधांचा पुरवठा कधीच सुरळीत न झाल्याने या उपक्रमाचा उद्देशच धूसर होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
या आजारासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा निधी फॅक्टर खरेदीसाठी वापरला जातो. मात्र सध्या उपलब्ध निधी अपुरा ठरत असून, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत औषधांचा साठा अत्यंत तोकडा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची जी प्रचंड धावपळ होते, त्याला कोणतीही मर्यादा उरलेली नाही.
रुग्णांच्या पालकांनी आपली व्यथा व्यक्त करताना सांगितले की,
“वेळीच फॅक्टर इंजेक्शन मिळाले नाही तर रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासगी रुग्णालयातील उपचार सर्वसामान्य कुटुंबांना परवडणारे नाहीत.”
विशेष म्हणजे शासनामार्फत मोफत किंवा सवलतीत उपलब्ध होणारे हे इंजेक्शनच जिल्हा रुग्णालयांमध्ये नसल्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. अनेक रुग्णांना उपचारांसाठी इतर जिल्ह्यांत जावे लागत असून, त्याचा आर्थिक, मानसिक व शारीरिक ताण कुटुंबांवर वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर हेमोफेलिया रुग्ण व त्यांच्या संघटनांनी शासनाकडे पुढील तातडीच्या मागण्या केल्या आहेत —
दीर्घकाळ टिकणारे फॅक्टर इंजेक्शन त्वरित उपलब्ध करून द्यावे
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नियमित व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा
रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा
जर शासनाने वेळीच ठोस निर्णय घेतला नाही, तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही रुग्ण संघटनांकडून देण्यात येत आहे. हेमोफेलिया रुग्णांच्या जीवनमरणाचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, प्रशासन जागे होणार का? असा थेट सवाल उपस्थित होत आहे.






