संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळी श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे रूक्मिणी स्वयंवर पारायण व तुळशी विवाह सोहळा भक्तिभावाने संपन्न.

संत मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळी श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे रूक्मिणी स्वयंवर पारायण व तुळशी विवाह सोहळा भक्तिभावाने संपन्न.
Advertisement

संदीप जोगी….मुक्ताईनगर …..:
कार्तिक महिन्यातील पवित्रआणि मंगलमय वातावरणात श्री संत मुक्ताबाई अंतर्धान समाधीस्थळ मुळमंदिर, श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे दि. ४ नोव्हेंबर २०२५, मंगळवार रोजी “रूक्मिणी स्वयंवर पारायण” व “तुळशी विवाह सोहळा” भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. दिवसभर परिसरात हरिनामाचा गजर, भक्तिरसाने भारलेले वातावरण आणि धार्मिकतेचा उत्सव पाहायला मिळाला.

प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थानतर्फे तुळशी विवाह उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. प्रबोधिनी एकादशीनंतर पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा यानिमित्ताने जपली गेली. दुपारी १ ते ४ या वेळेत श्रीसंत एकनाथ महाराज लिखित “रूक्मिणी स्वयंवर” ग्रंथाचे पारायण भक्तिमय रीतीने पार पडले. पारायणाचे पठण व वाचनाचे नेतृत्व ह.भ.प. दुर्गाताई संतोष मराठे यांनी भावपूर्ण आवाजात केले.

Advertisement

या पारायण प्रसंगी अनेक उपवर मुलामुलींनी सहभाग घेतला. “रूक्मिणी स्वयंवर” पारायणात सहभागी झाल्यास विवाहातील अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा असल्याने भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. पारायणानंतर गोरज मुहूर्तावर तुळशी विवाह सोहळा पारंपरिक विधींनुसार आणि मंगलध्वनीच्या गजरात पार पडला.पुढच्या वर्षीच्या सोहळ्याचे यजमानपद श्री विशालभाऊ सापधरे (मुक्ताईनगर) यांनी स्वीकारले
संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र (भैयासाहेब) पाटील, सोहळ्याचे प्रमुख व यजमान ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, संदीप पाटील, संदीप महाराज खामनीकर, व्यवस्थापक उध्दव महाराज जुनारे, यांच्यासह नाशिक विभागातील भाविक तसेच मध्यप्रदेश राज्यातील अनेक भाविकांनी उपस्थित राहून मुक्ताईंच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली.सोहळ्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

श्री संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने अध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी सर्व भाविकांचे, भक्तजनांचे, सेवेकऱ्यांचे व उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.

संपूर्ण दिवसभर श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर परिसर हरिनामाने दुमदुमला होता. नाद, नगारे, कीर्तन आणि भक्तिरसाने भरलेले वातावरण पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले.

“रूक्मिणी स्वयंवर पारायण आणि तुळशी विवाह सोहळ्याने मुक्ताईनगरी पुन्हा एकदा भक्तिभाव, मंगलध्वनी आणि श्रद्धेच्या झंकाराने उजळून निघाली.”

Subscribe to Viral News Live