बुलढाणा जिल्ह्यात अवैध देशी, विदेशी तसेच हातभट्टी दारूची चोरटी वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाचे पोलीस निरीक्षक श्री. सुनिल अंबुलकर यांनी अधिनस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके तयार करून कारवाईस सुरुवात केली.
त्या अनुषंगाने दि. 14 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, काही इसम चारचाकी वाहनातून देशी दारूचे बॉक्स बाळगून अमडापूर येथून ग्राम मंगरुळ नवघरे चौफुल्लीकडे चोरट्या पद्धतीने विक्रीसाठी येत आहेत. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ग्राम मंगरुळ नवघरे चौफुल्ली येथे नाकाबंदी केली.
नाकाबंदी दरम्यान आरोपी नामे (1) सुरेश जगन्नाथ सवडतकर वय 42 वर्षे रा. अमडापूर ता. चिखली आणि (2) शुभम विजय भालेराव वय 25 वर्षे रा. अमडापूर हे त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहनातून देशी दारूची चोरटी वाहतूक करताना मिळून आले. आरोपींच्या ताब्यातून देशी दारूचे एकूण 28 बॉक्स किंमत 1,08,640 रुपये तसेच मारुती सुझुकी कंपनीची एस-प्रेसो पांढऱ्या रंगाची कार किंमत 3,00,000 रुपये असा एकूण 4,08,640 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी पकडलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन अमडापूर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशन अमडापूर करीत आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहभाग:
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. श्रेणिक लोढा (खामगाव) आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोलीस निरीक्षक श्री. सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. अविनाश जायभाये, पोना. अनंता फरताळे, सुनिल मिसाळ, पोकॉ. अमोल शेजोळ, गणेश वाघ, सतीश नाटेकर तसेच मपोकॉ. पूजा जाधव यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.





