कोलते कॉलेजमध्ये १५ डिसेंबरला डॉ. हंकारे यांचे विशेष व्याख्यानाचे आयोजन

Advertisement

कोलते कॉलेजमध्ये १५ डिसेंबरला डॉ. हंकारे यांचे विशेष व्याख्यानाचे आयोजन
(जीवनाला ऊर्जितावस्था देणाऱ्या कार्यक्रमाबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता शिगेला!)

मलकापूर : पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पालक–विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक संवाद प्रस्थापित करण्यासाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून “बाप समजून घेताना संघर्षातून यशाकडे” या विषयावर होणाऱ्या या विशेष सत्रासाठी सर्वांना हार्दिक आमंत्रण देण्यात आले आहे. अनुभवी वक्ते मा. श्री. वसंत हंकारे सर या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. जीवनातील अडचणी, संघर्षांची जाणीव, वडिलांशिवाय घराचा कणा म्हणून आई–वडिलांच्या कष्टांचे मोल, नातेसंबंधातील भावनिक नाजूकपणा, तसेच यशाकडे वाटचाल करताना लागणारी जिद्द, चिकाटी आणि मनोधैर्य यावर ते विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

महाविद्यालयाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम दोन स्वतंत्र सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पदवी अभ्यासक्रमातील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांसाठी सकाळी ९.०० वाजता तर ८वी ते १२वी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी दुपारी १२.०० वाजता सत्र घेण्यात येणार आहे. सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम पार पडणार असून मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक व स्थानिक नागरिक सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताकद वाढवणे, योग्य जीवनदृष्टी विकसित करणे आणि त्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा या विशेष व्याख्यानाचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, श्री. सुधीर पाचपांडे तसेच अन्य व्यवस्थापन सदस्यांच्या पाठिंब्यामुळे अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन मिळते. सतत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम बनवण्यासाठी महाविद्यालय विविध उपक्रम राबवत असल्याचेही व्यवस्थापनाने नमूद केले आहे.

महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन अधिकारी डॉ. युगेश खर्चे यांनी सांगितले की,
“विद्यार्थ्यांनी संघर्षाला घाबरू नये. आई–वडिलांच्या त्यागाचे मोल समजून घेत प्रगतीची शिडी चढावी. हंकारे सरांसारख्या वक्त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना योग्य प्रेरणा देणारे ठरेल.”.कार्यक्रमाची माहिती देताना प्राचार्य अनिल खर्चे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या मानसिक बळकटीसाठी आणि भविष्यातील स्पर्धात्मक वातावरणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी अशा मार्गदर्शन सत्रांची नितांत गरज आहे. वसंत हंकारे सरांचे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि जीवनोन्मुख ठरेल.” त्यांनी सर्व विद्यार्थी, पालक, नागरिक व हितचिंतकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमासंदर्भातील अधिक माहितीसाठी प्रा. रमाकांत चौधरी, मो.९७६६११८९४० व प्रा. संदीप खाचणे, मो.९०९६४७०९९१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालयात होणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी नवी ऊर्जा, नवे विचार आणि यशस्वी भविष्याकडे नेणारी प्रेरणा ठरेल, असा विश्वास महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Subscribe to Viral News Live