मुक्ताईनगर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात अवैध देशी, विदेशी व गावठी दारूच्या विक्रीचा सुळसुळाट झाला असून हा गोरखधंदा खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे. या अवैध दारूमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून काही नागरिक गंभीर आजारांना बळी पडल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अवैध दारूच्या सेवनामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला असून काहीजण सध्या विविध ठिकाणी आजारी आहेत. असे असतानाही संबंधित यंत्रणांकडून ठोस व प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहर व तालुक्यातील नागरिकांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर तात्काळ व कडक कारवाई करण्याची मागणी केली असून, ही मागणी आता संपूर्ण तालुक्यात जोर धरत आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैध दारूच्या गोरखधंद्यावर आळा घालावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.




