धुळे : हिमोफिलिया सोसायटी, धुळे यांच्या वतीने रविवार, दिनांक १४ डिसेंबर रोजी विशेष फिजिओथेरपी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. हिमोफीलिया रुग्णांमध्ये हाताचा कोपर (Right/Left Elbow) किंवा गुडघा (Right/Left Knee) हे टार्गेट जॉईंट बनण्याचे प्रमाण वाढत असून भविष्यात अपंगत्व येण्याची शक्यता वाढते, हे लक्षात घेऊन हा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
नियमित फिजिओथेरपी केल्यास जॉईंट मजबूत होऊन सूज येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, धुळ्यात उपलब्ध असलेल्या बहुतांश फिजिओथेरपिस्टना हिमोफीलिया रुग्णांसाठी आवश्यक विशेष प्रशिक्षण नसल्यामुळे अशा रुग्णांना योग्य उपचार मिळण्यात अडचणी येतात.
या पार्श्वभूमीवर सोसायटीने पुण्यातील अनुभवी फिजिओथेरपिस्ट डॉ. अशोक ठाकरे यांना विशेष मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले असून, त्यांनीही आपला मौल्यवान वेळ देत रविवारच्या कॅम्पसाठी धुळे येथे उपस्थित राहण्याचे निश्चित केले आहे.
हिमोफीलिया सोसायटीचे सचिव स्वप्नील पाटील यांनी सर्व रुग्ण व पालकांना मोठ्या संख्येने कॅम्पमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “आपल्या आरोग्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा,” असे ते म्हणाले.






