अतीक खान मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यात छोटे गाव असो वा शहर परिसर—अवैध सावकारीचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दहा टक्के व्याजाने कर्ज देणे, हप्त्यात एक-दोन दिवस उशीर झाला की शिवीगाळ, धमक्या, अपमानास्पद वागणूक अशा गंभीर तक्रारी अनेक नागरिकांनी पुढे आणल्या आहेत.
काही ठिकाणी तर सावकारांकडून थेट घरात घुसून गोंधळ घालण्याचे, कुटुंबियांना धमकावण्याचे प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे, या सावकारांकडे कोणताही कायदेशीर परवाना किंवा लायसन्स नसतानाही खुलेआम सावकारीचा मनमानी कारभार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अवैध सावकारीच्या वाढत्या घटनांमुळे गावागावात असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.





