(अतीक खान जळगाव) जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवांनी राबवलेल्या प्रोजेक्ट महादेव राज्यस्तरीय स्काउटिंग प्रक्रियेतील अंतिम फेरीत जळगाव जिल्ह्यातील अश्विनी लक्ष्मीकांत ठाकूर (१३वर्षा आतील) हिची भव्य निवड झाली असून जळगाव जिल्ह्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) मार्फत आयोजित या राज्यव्यापी निवड प्रक्रियेत शेकडो प्रतिभावान खेळाडूंमध्ये चमकदार कामगिरी करत अश्विनीने अंतिम यादीत स्थान मिळवले आहे.
जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार निवड झालेल्या खेळाडूंना १४ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील वानखेडे स्टेडियम वर विशेष सत्कार व स्कॉलरशिप पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय निवड झालेल्या प्रतिभावान खेळाडूंना जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांची भेट घेण्याची दुर्मिळ संधी मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ११ ते १४ डिसेंबरदरम्यान मुंबईतील कूपरेंज फुटबॉल मैदानावर प्रोजेक्ट महादेवांतर्गत त्यांचे रेसिडेन्शियल कॅम्प आयोजित करण्यात आलेलेआहे.
वीफा चे माननीय सचिव डॉ. किरण चौगुले यांनी जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील व सचिव फारुक शेख तसेच प्रशिक्षकांचे व पालकांचे विशेष कौतुक करत अश्विनीने राज्यस्तरावर दाखवलेल्या उच्च प्रतिभेचे अभिनंदन केले आहे.
जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन तर्फे सचिव फारुक शेख यांना सुद्धा या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.





