Top 5 This Week

Related Posts

मुक्ताईनगरमध्ये मध्यप्रदेशातून येणारा गुटखा माफियांचा पुन्हा धुमाकूळ; प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचा सवाल

मुक्ताईनगर शहर व परिसरात अवैध गुटखा विक्रीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, गुटखा माफियांनी प्रशासनालाच जणू खुले आव्हान दिल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. राज्यभर गुटख्यावर बंदी असतानाही शहरातील चहाच्या टपऱ्या, पानठेले, किराणा दुकाने तसेच हातगाड्यांवर बिनधास्तपणे गुटख्याची विक्री सुरू असल्याने सुज्ञ नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वसामान्य नागरिक गुटख्याच्या विळख्यात अडकत असताना, संबंधित यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे अवैध विमल गुटख्याचे साठे आणि वाहतूक छुप्या मार्गाने शहरात आणणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा आहे.

काही काळापूर्वी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर गुटखा साठ्यावर कारवाई करून अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले होते. मात्र ही कारवाई आता थंडावल्याचे दिसत असून, त्यामुळेच गुटखा विक्रेते पुन्हा निर्धास्तपणे शहरभर धुमाकूळ घालत आहेत.
माफियांचे हात वर आले की प्रशासनाचे? असा संतप्त सवाल आता नागरिक उघडपणे विचारत आहेत.

गुटख्यामुळे कर्करोग, तोंडाचे गंभीर विकार, हृदयरोग यांसारखे जीवघेणे आजार होतात, तसेच लहान मुलांमध्ये वाढणारे गुटख्याचे व्यसन भविष्यासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. तरीही पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन तसेच नगरपंचायत यांची कोणतीही ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई दिसून येत नाही, ही बाब चिंतेची आहे.

शहरातील अवैध धंद्यांना नेमके कोण अभय देत आहे?
कारवाई थांबण्यामागे कोणाचा दबाव आहे?
हे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून ठामपणे उपस्थित केले जात आहेत.

जर तात्काळ कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई झाली नाही, तर नागरिक आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुटखा माफियांवर धडक कारवाई कधी होणार?
हा प्रश्न आता केवळ चर्चेपुरता न राहता जनतेच्या रोषात बदलत चालला आहे.

Atiq Bilal Khan
Atiq Bilal Khanhttps://viralnewslive.in/
Atiq Bilal Khan is the Official Representative of Viral News Live, responsible for coordinating news reports, field coverage, and ground-level updates. All information published under his name is provided and verified by him, and he is solely responsible for the content he shares here.Name: Atiq Bilal Khan Designation: Khandesh Divisional Editor Location: Seed Farm, Muktainagar, District Jalgaon (Khandesh) Phone: 9325146187

Popular Articles