‘व्हॉईस ऑफ मीडिया’ अधिवेशनातील १५ ठरावांची तातडीने अंमलबजावणीची मागणी
मुंबई | प्रतिनिधी । ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन पंढरपूर येथे उत्साहपूर्ण आणि भव्य स्वरूपात पार पडले. राज्यातील विविध जिल्ह्यांतून तब्बल दोन हजारांहून अधिक पत्रकारांनी उपस्थित राहून या दोन दिवसीय अधिवेशनाला उल्लेखनीय प्रतिसाद दिला. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सुरक्षिततेसाठी केंद्रित या अधिवेशनात विविध महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले.
अधिवेशनात पत्रकारांसाठी १० लाखांचा आरोग्य विमा आणि २५ लाखांचा अपघात विमा अनिवार्य करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच पत्रकार निवृत्तीवेतन योजना सुरू करणे, सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये पत्रकारांसाठी २ टक्के राखीव कोटा ठेवणे, जिल्ह्यातील प्रेस-क्लबांचे आधुनिकीकरण आणि माहिती खात्याकडून ‘मीडिया सपोर्ट सेल’ स्थापन करणे यासारख्या निर्णयांना व्यापक पाठिंबा मिळाला. न्यूज पोर्टल नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे, पत्रकारांवरील खोटे खटले मागे घेण्यासाठी विशेष समिती स्थापन करणे आणि राज्यस्तरीय पत्रकार प्रशिक्षण अकादमी उभारणे या मागण्यांचाही ठरावात समावेश होता.
आपत्तीग्रस्त पत्रकारांसाठी तात्काळ मदत निधी, महिला पत्रकारांसाठी सुरक्षित निवास, प्रवास भत्ता, मातृत्व रजा, क्रेच सुविधा आणि कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याबाबतही अधिवेशनात एकमुखी ठराव संमत करण्यात आला. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विशेष पत्रकार सन्मान योजना सुरू करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
संघटनेने अधिवेशनात पारित केलेले सर्व १५ ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य मंत्रिमंडळाला प्रत्यक्ष भेटून सादर करणार असल्याची माहिती दिली. तसेच सर्व पालकमंत्र्यांना स्थानिक पातळीवर भेटून मागण्या पोहोचविण्यात येणार आहेत. सरकारने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असा स्पष्ट इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के व सरचिटणीस संदीप काळे यांनी दिला.

