असंख्य भाविकांच्या उपस्थितीत संत मुक्ताई मंदिरात तुळशी विवाह व पादुका मिरवणुकीचा भव्य सोहळा पार पडला!
मुक्ताईनगर (अतिक खान)
संत मुक्ताईच्या पावन भूमीत भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम घडविणारा श्री स्वामी समर्थ पादुका आगमन सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास केंद्र, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) यांच्या वतीने प्रस्थान ठेवलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुका दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी मुक्ताईनगर येथे आगमन झाल्या.
या आगमनाचे औचित्य साधून कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळी निमित्त नवीन संत मुक्ताई मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला.
या वेळी असंख्य सेवेकरी भगिनी, भक्त, महिला मंडळे आणि सेवेकरी बांधवांनी हजेरी लावून अध्यात्माच्या सागरात न्हाऊन निघाले.
भव्य मिरवणुकीने उजळली मुक्ताईनगरी!
६ नोव्हेंबर २०२५ (गुरुवार) रोजी सकाळी नवीन मुक्ताई मंदिरापासून श्री स्वामी समर्थ केंद्र, जुने गाव मुक्ताईनगरपर्यंत स्वामींच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निघाली.
संपूर्ण पालखी मार्ग फुलांच्या आणि रांगोळ्यांच्या सजावटीने सुशोभित झाला होता. श्रद्धाळूंनी ठिकठिकाणी पादुकांचे पूजन, आरती, फुलवर्षाव आणि भक्तिगीतांद्वारे स्वागत केले.
“जय जय स्वामी समर्थ!” च्या घोषात वातावरण दुमदुमून गेले.
सेवेकरी बांधवांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
भाविकांना नितीनकुमार जैन यांनी पिण्याच्या पाण्याचे वाटप करून प्रशंसनीय सेवा बजावली.
आध्यात्मिक एकतेचा संदेश देणारा हा पादुका सोहळा भक्तांच्या अंत:करणात नवी श्रद्धा, भक्ती आणि समाधान निर्माण करून गेला.
मुक्ताईनगर शहर भक्तीमय रंगात न्हाऊन निघाले आणि संत परंपरेचा वारसा या सोहळ्याद्वारे पुन्हा उजळून निघाला.

