जळगाव — शाहीन उर्दू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, मेहरूण येथे इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा प्रथम सत्र निकाल वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. सकाळपासूनच निकाल घेण्यासाठी 11 आणि 12 वी च्या पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकतेचे मिश्र भाव दिसत होते. अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मेहनती बद्दल कौतुक केले.कार्यक्रमात शिक्षकांनी प्रत्येक वर्गाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना अधिक मन लावून अभ्यास करण्याचे, नियमित पुनरावृत्ती करण्याचे आणि आगामी परीक्षांसाठी अधिक तयारी करण्याचे मार्गदर्शन केले. विशेषतः 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या अनुशंगाने महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. मुख्याध्यापकांनी श्री.काझी जमिरुद्दीन यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांची तिहेरी जबाबदारी महत्त्वाची आहे. नियमितता, शिस्त आणि कष्ट हेच यशाची गुरुकिल्ली आहेत.” तसेच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील सत्रासाठी शुभेच्छा दिल्या.समारोपात शाळेच्या व्यवस्थापनाने शिक्षकवर्गाच्या व परीक्षा विभागाच्या मेहनतीचे कौतुक केले आणि शैक्षणिक गुणवत्तेत आणखी वाढ करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी इकरा बी एड कॉलेजचे इंटरनशिपचे विद्यार्थीही उपस्थित होते.

