वादांची नौटंकी की मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न? – प्रशांत पाटील
राजकीय नौटंकी की जनतेपासून लक्ष विचलित करण्याचा डाव? – प्रशांत पाटील
बुलढाणा – राज्याच्या राजकारणात सध्या एक विचित्र दृश्य दिसतंय पार्थ पवार, रूपाली चाकणकर आणि रूपाली ठोंबरे यांच्या नावाने सुरू असलेले वाद, आरोप-प्रत्यारोप यांचा गजर संपूर्ण माध्यमांमध्ये आहे. पण या सगळ्या गोंधळामागे नेमकं काय लपवलं जातंय, हा खरा प्रश्न आहे.
गेल्या काही दिवसांत पार्थ पवारांवर १८०० कोटींच्या कथित जमीन घोटाळ्याचा आरोप झाला.
या प्रकरणात महार वतनाची, कोरेगाव येथील ४३ एकर जमीन जी बाजारभावाने सुमारे १८०० कोटी रुपयांची आहे ती केवळ ३०० कोटींना खरेदी करण्यात आली, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. त्यातच २१ कोटींच्या स्टॅम्प ड्यूटीच्या जागी केवळ ५०० रुपयात व्यवहार पूर्ण केल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे.
पण आश्चर्य म्हणजे, या विषयावर चर्चा होण्याआधीच माध्यमांमध्ये रूपाली चाकणकर आणि रूपाली ठोंबरे यांच्या ‘वादळाने’ सगळं लक्ष खेचून घेतलं. दोन महिलांच्या वैयक्तिक भांडणाच्या मुद्द्याला दिलेलं अतिप्रमाणात महत्त्व, हे केवळ जनतेचं लक्ष मुख्य विषयापासून म्हणजेच पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणापासून विचलित करण्याचं प्रयोजन नाही का, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
राज्याच्या जनतेसमोर आज प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न उभे आहेत. पण माध्यमांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रचारयंत्रणेत फक्त वाद, खोट्या नाट्या आणि वैयक्तिक टीका चालू आहे.
राजकारणातील हे ‘नाट्य’ म्हणजे जनतेला मूळ प्रश्नांपासून दूर ठेवण्याची पद्धत बनली आहे.
जनतेने आता हे ओळखायला हवे की जेव्हा जेव्हा एखादा गंभीर घोटाळा उघडकीस येतो, तेव्हा त्याच वेळी कुठेतरी एक “वाद” उभा राहतो आणि तोच संपूर्ण चर्चेचा विषय बनतो.
जनतेला भ्रमात ठेवण्याचा हा खेळ थांबवला नाही, तर पुढची पिढी प्रश्न विचारणंही विसरेल.
राजकारणात पारदर्शकता आणि जबाबदारी हीच खरी शक्ती आहे आणि ती हरवली, तर सगळं काही केवळ नाट्य बनून राहील असे मत प्रशांत ढोरे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

