अंबा नदीतील रिलायन्सच्या प्रदूषणामुळे मच्छीमार संकटात; प्रसाद दादा भोईर, शिवसेना (उबाठा) रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आक्रमक, फौजदारी कारवाईची मागणी
: रिलायन्स कंपनीकडून अंबा नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे सोडण्यात येणाऱ्या विषारी रासायनिक सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करत आज शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रिलायन्स कंपनीकडून केमिकलयुक्त आणि विषारी सांडपाणी थेट अंबा नदीत सोडले जात आहे. या रासायनिक प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असून मोठ्या प्रमाणावर मासे मृत पावत आहेत किंवा स्थलांतर करत आहेत. मच्छीमारांनी पकडलेल्या मासळीलाही रासायनिक वास येत असल्याने ती बाजारात विकली जात नाही, ज्यामुळे हजारो भूमिपुत्रांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) यावर तत्काळ कारवाई केली नाही, तर जनआंदोलन उभारले जाईल असा स्पष्ट इशारा प्रसाद भोईर यांनी दिला आहे. प्रांताधिकारी यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.
सदर शिष्टमंडळात पेण तालुका प्रमुख समिर म्हात्रे, माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, पेण शहर प्रमुख सुहास म्हात्रे, तालुका संपर्क प्रमुख भगवान पाटील, तालुका युवा अधिकारी योगेश पाटील, विभाग प्रमुख, नंदू म्हात्रे, दिपक पाटील, चंद्रहास म्हात्रे,जयराम बडे आदि उपस्थित होते.
लेखणी शस्त्र न्यूज तालुका प्रतिनिधी सुदर्शन कोटकर

