राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा अधिकार अनुषंगिक तरतुदीनुसार जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना प्रदान केला असून, या अधिकारांचा वापर करून मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदार प्रभाग, निवडणूक प्रक्रिया आणि संबंधित सर्व तारखा निश्चित करण्यात आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिध्दीपत्रकानुसार, प्रभाग क्रमांक १ ते १५ साठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये संतोष शिंदे (उपविभागीय अधिकारी, मलकापूर), तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून संजय केदार (मुख्याधिकारी, नगर परिषद मलकापूर) आणि राहुल तायडे (तहसीलदार व अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी, मलकापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरण्यासाठी १० नोव्हेंबर २०२५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्रांची प्रत्यक्ष स्वीकारणी ही याच काळात सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात येईल. रविवारी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.
नामनिर्देशन पत्रांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार असून, वैध उमेदवारांची यादी त्याच दिवशी जाहीर केली जाईल. नामनिर्देशन माघार घेण्यासाठीची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. वैध उमेदवारीच्या यादीविषयी अपील करायचे असल्यास, जाहीर झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येणार आहे. अपीलवरील निर्णय २१ ते २५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दिला जाणार आहे.
निवडणूक चिन्हांचे वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल. आवश्यक असल्यास मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत घेण्यात येईल. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० पासून शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय, मलकापूर येथे होईल. प्रकरणाचा अंतिम निकाल महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात १० डिसेंबर २०२५ पूर्वी प्रकाशित केला जाणार आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे ३५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण १६ नोव्हेंबर, २२ नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी होणार आहे. राजकीय पक्षांची बैठक ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात घेण्यात येईल. तसेच क्षेत्रीय अधिकारी, झोनल अधिकारी, मदत कक्ष आणि आदर्श आचारसंहिता समितीची स्थापना करण्यात आली आहे.
याशिवाय, अनुसूचित जाती – २, नामनिर्देशन मागास – ८ आणि सर्वसाधारण – २० अशी आरक्षण रचना निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती महिला – १, मागासवर्गीय महिला – ४ आणि सर्वसाधारण महिला – १० जागांचा समावेश आहे. मलकापूर नगर परिषदेतील एकूण मतदारसंख्या ५७,७८६ असून यात पुरुष मतदार २९,३२९, महिला मतदार २८,४६१ आणि इतर मतदार ४ अशी नोंद आहे. शहरात ईव्हीएमची मागणी, वाहतूक व्यवस्था, साहित्य पुरवठा आणि मतदान केंद्रांची स्थापना पूर्ण करण्यात आली असून आचारसंहितेचे काटेकोर पालन सुरू आहे.
नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी १० ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याची सुधारित माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

