
राजिक शेख विशेष प्रतिनिधी.| Viral news live
नांदुरा तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती पुनम श्रीकृष्ण थोरात (वय ३४ वर्षे), वर्ग-२, पुरवठा निरीक्षण अधिकारी, रा. माऊली नगर, पाचपोर यांना अँटी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी १६,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई १४ नोव्हेंबर २०२५ रोजी नांदुरा तहसिल कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी यांच्या दालनात पार पडली.
तक्रारदाराच्या चुलत्यांच्या नावावर स्वस्त धान्य दुकान असून ते दुकान तक्रारदार स्वतः चालवितात. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पुरवठा अधिकारी नांदुरा यांनी दुकानाची तपासणी केली होती. तपासणी अहवालात कोणतीही त्रुटी नसतानाही हा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यासाठी तसेच दुकानातील धान्य पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी १६,००० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरो, बुलढाणा येथे करण्यात आली होती.
त्यानुसार आज आयोजित पडताळणी कार्यवाहीत आणि नंतरच्या सापळा कारवाईत, तक्रारदाराकडून १६,००० रुपये स्वीकारताना श्रीमती पुनम थोरात यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक श्री सचिंद्र शिंदे, तसेच पोलीस उपअधीक्षक श्री भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्री रमेश पवार आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.
अँटी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय कर्मचारी लाच मागत असल्यास तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा —
दूरध्वनी: ०७२६२-२४२५४८
व्हॉट्सअॅप: ९४०५०९१०६४
टोल-फ्री क्रमांक: १०६४

