मलकापूर – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी संकेत संजय सावळे याने अँटी रॅगिंग नॅशनल कॉन्टेस्ट २०२५ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयासह मलकापूर शहराचा अभिमान वाढविण्यात संकेतनं मोठा वाटा उचलला आहे.
ही स्पर्धा विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय अँटी रॅगिंग देखरेख संस्था (सेंटर फॉर यूथ) यांच्या वतीने देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगविरोधी जनजागृती निर्माण करणे, शैक्षणिक परिसरात सुसंवाद, शिस्त, आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा आहे.
देशभरातील विविध राज्यांतील हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. संकेतनं “युट्यूब व्हिडिओ श्रेणी” अंतर्गत सादर केलेल्या सामाजिक संदेशपर व्हिडिओद्वारे रॅगिंगविरोधी जनजागृतीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्याच्या या कलात्मक आणि जनजागृतीपर प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, त्याला गौरव प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.या उल्लेखनीय कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात एक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या हस्ते संकेतनं सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. योगेश सुशीर, तसेच प्रा. सदाशिव लवंगे, प्रा. निलेश बुडूखले, प्रा. निलेश बुंधे आणि प्रा. अमोल हळदे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिष्ठाता डॉ. युगेश खर्चे, तसेच अँटी रॅगिंग समितीच्या समन्वयक प्रा. तेजल खर्चे यांनीही मार्गदर्शन करून संकेतनं दिलेल्या सामाजिक संदेशाचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक शिक्षणातच नव्हे, तर सामाजिक भान जपत समाजहिताच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. संकेतनं सादर केलेला व्हिडिओ रॅगिंगविरोधी जागरूकतेचा प्रभावी संदेश देणारा असून तो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना नेहमीच सामाजिक बांधिलकी असलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. संकेतनं मिळवलेल्या या राष्ट्रीय गौरवामुळे पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर तसेच इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उजळले आहे. संकेतच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, इतर विद्यार्थ्यांसाठी तो एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे असे प्रतिपादन व्यवस्थापन समितीचे खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे, सदस्य श्री. देवेंद्र पाटील, श्री.पराग पाटील डॉ. गौरव कोलते देवेंद्र पाटील यांनी केले आहे.

