बुलढाणा (प्रतिनिधी) — वॉइस ऑफ मीडिया बुलढाणा उर्दू विंगतर्फे जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवडणुकीदरम्यान RNI (Registrar of Newspapers for India) व PRGI (Press Registrar General of India) मान्यताप्राप्त पत्रकारांना प्रवेश नाकारण्याच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्य शासनाने नुकताच काढलेल्या आदेशानुसार मतदान केंद्रे व मतमोजणी केंद्रांवर केवळ राज्य शासनाच्या यादीतील वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून नोंदणीकृत (RNI) तसेच PRGI कडून मान्यता प्राप्त असलेल्या पत्रकारांना प्रवेश नाकारला जात आहे.
वॉइस ऑफ मीडिया संस्थेचे जिल्हा अध्यक्ष (उर्दू विंग) जफर खान अतहर खान यांनी निवेदनात नमूद केले की — “RNI व PRGI या दोन्ही संस्था भारत सरकारमान्य असून त्यांच्याकडून नोंदणीकृत वृत्तपत्रे व पत्रकारांना प्रवेश न देणे हे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. आज अनेक स्वतंत्र व ऑनलाईन माध्यमे समाजापर्यंत सत्य माहिती पोहोचविण्याचे कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत. त्यांना शासनाच्या यादीत नसल्यामुळे वगळणे हे लोकशाहीच्या पारदर्शकतेस बाधक ठरेल.”
निवेदनात मागणी करण्यात आली की RNI व PRGI मान्यताप्राप्त पत्रकारांना निवडणुकीदरम्यान प्रवेशिका देण्यात याव्यात, शासनाने घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करून सर्व पत्रकारांना समान संधी द्यावी, तसेच ऑनलाईन व स्वतंत्र माध्यमांनाही पारदर्शकतेच्या दृष्टीने प्रवेश द्यावा.
या प्रसंगी मोहम्मद सरवर मोहम्मद अल्ताफ, इलिया शाह अशफाक शाह, शेख इरफान शेख ईसा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

