दिनांक :१५/११/२०२५
इंदापूर तालुक्यातील निमसाखर गाव परिसरात सध्या पाच महिन्याच्या कांद्याची लागवड जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांनी फेक कांदा विस्कटून नव्याने रोपे टाकण्याचे काम वेगाने सुरू केले असून, सकाळपासून शेतात मोठ्या प्रमाणावर मजूरदेखील कामाला लागले आहेत.
या वर्षी पावसाचा अनियमित पॅटर्न आणि बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचे वेळापत्रक थोडे पुढे ढकलले होते. आता जमिनीची ओल आणि हवामानाची स्थिती अनुकूल झाल्यामुळे पाच महिन्याच्या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. शेतकरी सांगतात की, योग्य वेळी लागवड झाल्यास उत्पादन चांगले मिळण्याची शक्यता अधिक असते अशी माहिती निमसाखरचे शेतकरी श्री युवराज सर्जेराव रणमोडे यांनी दिली त्यांनी हेही सांगितले की आमच्या परिसरामध्ये श्री राजाराम बाबुराव दळवी हे अत्यंत चांगल्या पद्धतीने कांदा बी विस्कटून देतात. कांद्याची उगवण समान होते.
काही शेतकऱ्यांनी ड्रिप सिंचनाचा वापर सुरू केला असून त्यामुळे पाण्याची बचत तसेच कांद्याच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे, बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात चिंता दिसून येत असली तरी उत्पादन चांगले मिळाले तर परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निमसाखर व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सध्या कांदा रोपांची लावणी पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

