बुलढाणा, दि. 19 नोव्हेंबर 2025 :
बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील फरार आणि अभिलेखावरील पाहिजे आरोपींना शोधून अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दहा वर्षांपासून फरार असलेल्या खूनाच्या आरोपीसह आणखी एका फरार आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे सन 2016 पासून फरार असलेला आरोपी शेख इरफान ऊर्फ काल्या शेख अश्पाक (वय 33, रा. मीलिंदनगर, बुलढाणा) याला आज दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी अटक केली. आरोपीवर पोलीस स्टेशन रायपूर येथे अपराध क्रमांक 16/2016 अंतर्गत कलम 302, 201, 120(ब) भादंवि नुसार खुनाचा गुन्हा दाखल असून, गुन्हा नोंद झाल्यानंतर तो सतत फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी बुलढाणा शहरात आल्याचे समजताच पथकाने तात्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीसाठी रायपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात सोपविले.
याशिवाय, दि. 18 नोव्हेंबर 2025 रोजी दे. राजा पोलीस स्टेशनच्या अपराध क्रमांक 269/2024, कलम 309(6), 310 बी.एन.एस. मधील गुन्ह्यातून फरार असलेला आरोपी अभय दिलीप डोंगर (वय 24, रा. कन्हैय्या नगर, जालना) यालाही जालना येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला आवश्यक कार्यवाहीसाठी दे. राजा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या यशस्वी मोहिमेत पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, दिगंबर कपाटे, पोना. अनंता फरतळे, सुनिल मिसाळ, पोकॉ गणेश वाघ, मनोज खरडे आणि मपोकॉ आशा मोरे यांचा उल्लेखनीय सहभाग राहिला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्षतेचे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे उत्तम उदाहरण मानली जात आहे.

