बुलढाणा :
बुलढाणा जिल्ह्यात अवैध बायोडिझेलविरुद्ध जिल्हा प्रशासनाने आज निर्णायक पाऊल उचलत मोठी कारवाई केली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेर–मलकापूर रोडवर संशयितरीत्या उभ्या असलेल्या एका टॅंकरवर छापा घालण्यात आला. या कारवाईत २९०३० किलो अवैध बायोडिझेल जप्त करण्यात आले असून त्याची बाजारमूल्ये १२ लाख ३३ हजार १९४ रुपये इतकी असल्याचे प्रशासनाने सांगितले.
उपलब्ध माहितीनुसार, टॅंकर क्रमांक GJ03BW3034 रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत उभा होता. चौकशीदरम्यान चालक सहदेव याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला आणि पथकाने तत्काळ छापा टाकला. तपासात उघड झाले की हे बेकायदेशीर बायोडिझेल हॉनेस्ट कॉर्पोरेशन, पणोली, अंकलेश्वर (भरूच, गुजरात) येथून बापा सीताराम ट्रेडिंग, वाघुड (ता. मलकापूर) येथे पाठविले जात होते.
गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी विशेष पथक तयार केले होते. कारवाईनंतर संबंधित टॅंकर ताब्यात घेण्यात आला असून, तहसीलदार राहुल तायडे आणि पुरवठा निरीक्षक धनश्री हरणे यांच्या मार्फत संबंधितांवर एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास जिल्हा प्रशासन आणि पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्याकडे आहे.
डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट संदेश दिला की,
“जिल्ह्यात अवैध बायोडिझेलचा कोणताही व्यवहार कदापिही सहन केला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तत्काळ प्रशासनाला कळवावी.”

