(अतिक खान)मुक्ताईनगर
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालल्याचे गंभीर चित्र आता समोर येत आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत शांत, सुस्थितीतील मानला जाणारा हा जिल्हा आज गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेला दिसत आहे. दररोज कुठे ना कुठे चोरी, दरोडे, मारहाण, खून, गोळीबार अशा घटनांचे सत्र सुरूच असून नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलीकडच्या काळात गोळीबाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्या आता “नुसता पोरखेड सारखा प्रकार” बनल्या आहेत. एका घटनेची धास्ती संपत नाही तोच दुसरा गोळीबार होतो, असे जणू चक्र तयार झाले आहे. पोलिस प्रशासनावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील संवेदनशील भागात गस्त वाढवणे, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आणि गुप्त माहिती यंत्रणा मजबूत करणे यावर भर देणे गरजेचे आहे.
राजकीय हस्तक्षेप, बेरोजगारी, आर्थिक विषमता आणि नशेचे वाढते प्रमाण हीसुद्धा गुन्हेगारी वाढण्याची प्रमुख कारणे असल्याचे समाजतज्ज्ञांचे मत आहे. योग्य वेळी ठोस पावले न उचलल्यास जळगाव जिल्हा कायमचा असुरक्षिततेच्या छायेत जाईल, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक एकच मागणी करत आहेत — “आम्हाला सुरक्षित जीवन हवे आहे!”

