(अतीक खान जळगांव)
भारतीय संविधान हा मानव मुक्तीचा जाहीरनामा असून मानवतेसाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी एक ऐतिहासिक दस्ताऐवज आहे.समताधिष्ठित समाज आकाराला यायचे असेल तर संविधान प्रत्येक नागरिकाच्या मनात रूजविणे गरजेचे आहे.
संविधानाचा सन्मान करणे , संविधानाचे संवर्धन करणे,आणि संविधानाची सुरक्षा करणे, जागरूक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे.धर्मांध शक्ती पदोपदी संविधानाचा अपमान करत आहेत.अशा काळात संविधानाचा जाहीरपणे सन्मान करण्यासाठी हे संमेलन जळगाव नगरीत आयोजित केले आहे. या संमेलनातून राज्याला संविधान जागृतीची एक विधायक दिशा गवसणार आहे.यासाठी व्यापक प्रमाणात सर्वांनी संमेलनाची प्रसिद्ध करून संमेलन यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे.
ज्यांना अर्थबळ देणे शक्य आहे,त्यांनी पैसा उभा करावा, विचारवंतांनी, अभ्यासकांनी आपले लेख,भाषण, विचार याव्दारे संमेलनाची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सहकार्य केले पाहिजे.तर ज्यांना श्रम द्यायचे त्यांनी अहोरात्र कष्ट उपसले पाहिजेत.असे आवाहन राज्यस्तरीय संविधान संमेलनाचे मुख्य संयोजक मुकुंदभाऊ सपकाळे यांनी केले आहे.
या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध विचारवंत, धुरंधर वक्ते, साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे असणार आहेत.
या संमेलनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध व्यंगकवी संपत सरल,जयपूर यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोपाच्या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. संमेलनात परिसंवाद ,विविध सत्रे, कवी संमेलन, भाऊ थुटे यांचे राष्ट्र जागृतीचे कीर्तन, असे एकाहून एक सरस प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले, असून जास्तीत जास्त नागरिकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा. त्यासाठी कार्यकर्त्यांनी संमेलनाच्या जनजागृती करता व्यापक प्रमाणात प्रसिद्धीचे कार्य करावे. समाजातील सर्व घटकांनी युवक, महिला, शेतकरी, मजूर, कष्टकरी, नोकरदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संवैधानिक विचार समजून घेण्यासाठी संमेलनामध्ये एकत्रित आले पाहिजे, असा राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाच्या आयोजन समितीचा मानस आहे.

