(डॉ. सचिन खर्चे यांच्या ‘सन अॅण्ड शाईन हॉस्पिटल’, जळगाव मधून वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती)



मलकापूर : खान्देशातील वैद्यकीय क्षेत्रात नवा अध्याय लिहिला गेला आहे. मलकापूर येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक श्री किशोर खर्चे (सरस्वती कापड दुकान) यांचे सुपुत्र व प्रख्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सचिन खर्चे यांनी जळगाव येथे ‘सन अॅण्ड शाईन हॉस्पिटल’ या अत्याधुनिक आरोग्यसंस्थेची स्थापना करून खान्देशातील पहिले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी सेंटर सुरू केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही सुविधा म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. या हॉस्पिटलमध्ये रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने गुडघा, नितंब, खांदा आणि मणक्याच्या सांध्यांच्या शस्त्रक्रिया अत्यंत अचूकता, कमी वेदना आणि जलद पुनर्वसनासह करण्यात येणार आहेत. यामुळे रुग्णांना मुंबई, पुणे किंवा परदेशात जाण्याची गरज उरणार नाही.
या भव्य हॉस्पिटलचे उद्घाटन जळगाव येथे अतिशय उत्साहात पार पडले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. अरविंद कोलते, पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा नगरसेवक डॉ. अनिल खर्चे, सामाजिक कार्यकर्ते सुधीरभाऊ पाचपांडे, तसेच मुंबईचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. एस. डी. पाटील हे मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. सचिन खर्चे यांच्या पुढाकाराचे मनःपूर्वक अभिनंदन करताना सांगितले की, खान्देशातील रुग्णांना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक उपचार आपल्या शहरातच मिळावेत ही त्यांची दूरदृष्टी आणि सेवा वृत्ती अनुकरणीय आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. सचिन खर्चे म्हणाले की, “आमचे उद्दिष्ट रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा देण्याचे आहे. अत्याधुनिक रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित व कमी वेदनादायक होतात. या प्रणालीमुळे रुग्ण लवकर चालू लागतो आणि त्याच्या जीवनमानात सुधारणा होते.” हॉस्पिटलमध्ये रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट व्यतिरिक्त दुर्बिणीद्वारे मणक्याचे वर्ग उदय, गुडघा व खांद्याच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया, तसेच आधुनिक फिजिओथेरपी व पुनर्वसन विभाग देखील सुरु करण्यात आले आहेत. येथे अनुभवी डॉक्टर्स, प्रशिक्षित परिचारक आणि अत्याधुनिक आय सी यु तसेच मॉड्युलर ऑपरेशन थिएटरची सुविधा उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सवलतीच्या उपचारयोजना राबविण्याचा संकल्प हॉस्पिटलकडून करण्यात आला आहे. डॉ. खर्चे म्हणाले की, “वैद्यकीय सेवा हा व्यवसाय नसून समाजसेवेचा मार्ग आहे. प्रत्येक रुग्णाला योग्य आणि परवडणारे उपचार मिळावेत हेच आमचे ध्येय आहे.” या उपक्रमामुळे जळगाव व खान्देश परिसरातील हजारो रुग्णांना आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा आपल्या जिल्ह्यातच मिळणार आहे.
या कार्यक्रमाला खर्चे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी डॉ. सचिन यांच्या कार्याचा अभिमान व्यक्त करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उद्घाटन समारंभाच्या शेवटी डॉ. खर्चे यांनी आपल्या आई-वडिलांचे आशीर्वाद, गुरुजनांचे मार्गदर्शन आणि रुग्णांचा विश्वास यामुळेच हा प्रकल्प शक्य झाल्याचे सांगत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
‘सन अॅण्ड शाईन हॉस्पिटल’च्या माध्यमातून खान्देशात आधुनिक आरोग्यसेवेचा नवा सूर सुरू झाला असून, जळगाव आता वैद्यकीय दृष्ट्या प्रगतीच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे.

