मलकापूर (प्रतिनिधी): पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर येथील अंतिम वर्ष विद्युत अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी विनय जयंत पाटील याने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आयोजित आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.या भव्य यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्याच्या क्रीडाप्रेम, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावामुळे मिळालेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डब्ल्यू. खर्चे यांनी विनयचे मनःपूर्वक अभिनंदन करताना सांगितले की,“आमच्या विद्यार्थ्याने क्रीडा क्षेत्रात मिळवलेले हे यश केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे तर संपूर्ण संस्थेसाठी गौरवाची बाब आहे. शैक्षणिक उत्कृष्टतेबरोबरच आमचे विद्यार्थी क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवत आहेत.” महाविद्यालयाचे प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे यांनी विनयला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना सांगितले की,“क्रीडा हा व्यक्तिमत्व विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रातही आपली कामगिरी सिद्ध करावी, हीच खरी प्रगती.”
या यशात क्रीडा प्रमुख प्रा. सचिन बोरले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी विनयच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे कौतुक करताना सांगितले की,“विनयने नियमित सराव, शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि सकारात्मक वृत्तीमुळे हे यश मिळवले आहे. त्याच्याकडे पुढे राष्ट्रीय स्तरावर पदक मिळवण्याची क्षमता आहे.” या यशाबद्दल विनय पाटीलने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की,“हे यश माझ्या शिक्षकांचे, क्रीडा प्रमुखांचे आणि महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण पाठबळाचे फळ आहे. मी आणखी मेहनत घेऊन राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवण्याचा प्रयत्न करीन.”
संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते, तसेच खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे यांनीही विनयचे अभिनंदन करून भविष्यात आणखी मोठी यशस्वी कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की,“संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना सर्वतोपरी प्रोत्साहन दिले जाते. अशा विद्यार्थ्यांमुळे संस्थेचा गौरव वाढतो आणि इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते.”या स्पर्धेत अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत अनेक महाविद्यालयांमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रखर स्पर्धेमध्ये विनयने उत्कृष्ट कौशल्य आणि फिटनेस दाखवत सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या दमदार कामगिरीमुळे परीक्षकांनी त्याला रौप्य पदकासाठी निवडले.महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख, शिक्षकवर्ग, तसेच विद्यार्थ्यांनी विनयचे कौतुक करून त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

