मलकापूर (प्रतिनिधी) : कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना व मेकॅनिकल विभाग (पॉलीटेक्निक) यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित जवाहरलाल नेहरू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी व स्वयंसेवकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याने झाली. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, “पंडित नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते. वैज्ञानिक दृष्टीकोन, प्रगत शिक्षण व्यवस्था आणि तंत्रज्ञानाधारित राष्ट्रनिर्मितीचा पाया त्यांनी घातला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन ज्ञान, संघटन, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांना आचरणात आणले पाहिजे. देशाच्या विकासात प्रत्येक विद्यार्थी सक्रिय योगदान देईल, अशीच अपेक्षा आहे.” प्राचार्य सरांचे हे विचार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.
यानंतर प्रा. अमोल तांबे यांनी नेहरूंच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदान, त्यांचे दूरदृष्टीपूर्ण विचार, बालप्रेम व आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांनी केलेल्या कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नेहरूंच्या विचारांचे आजच्या पिढीसाठी असलेले महत्त्व समजावून सांगत प्रेरणादायी संदेश दिला.
या कार्यक्रमाला प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांच्यासह प्राध्यापकवर्ग व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये प्रा. सदाशिव लवंगे, प्रा. प्रवीण पाटील, प्रा. राजेश सरोदे, प्रा. प्रतीक पाटील, प्रा. सम्राट राजपूत तसेच प्राध्यापिका संगिता खर्चे, ख्याति चौधरी, भाग्यश्री नारखेडे, स्नेहल पवार, मयुरी पाटील, आंचल गोळे आणि अनीता होळे यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नेहरूंच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले. महाविद्यालयात नेहरू जयंती प्रेरणादायी वातावरणात, शिस्तबद्धपणे आणि उत्साहपूर्ण पद्धतीने साजरी करण्यात आली.

