निमखेडी बुद्रुक प्रतिनिधी: इच्छापुर ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात गेल्या काही वर्षांपासून विकासाची गती लक्षणीयरीत्या वाढली आहे. पाणीपुरवठा सुधारणा, अंतर्गत रस्त्यांची उभारणी, गटारींची सोय, समाजमंदिर बांधणी तसेच धार्मिक स्थळांचे नूतनीकरण अशा अनेक कामांमुळे गावाचा चेहरा बदलू लागला आहे. सरपंच गणेश थेटे यांच्या पुढाकारामुळे दीर्घकाळ अपुरी राहिलेली अनेक मूलभूत सुविधा पूर्णत्वाच्या दिशेने जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तथापि, या सर्व प्रगतीच्या पार्श्वभूमीवर गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अद्याप योग्य अशी बैठक व्यवस्था नसल्याची बाब प्रकर्षाने पुढे येत आहे. दिवसभर गावातील चौकात किंवा मंदिर परिसरात एकत्र येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कुठलीही कायमस्वरूपी व सुरक्षित सोय उपलब्ध नाही. याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे बाकडे आणि बसण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्याची औपचारिक मागणी केली आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गावाच्या सर्वांगीण विकासासोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसुविधांकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या आरोग्याची व गरजांची दखल घेत त्यांच्या साठी आरामदायक बैठक सुविधा उभाराव्यात, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीकडून व्यक्त केली जात आहे.

