(अतीक खान)मुक्ताईनगर)
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधील शिवसेना उमेदवार नितीन मदनलाल जैन यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या 18 तारखेला जारी केलेल्या परिपत्रकाचा दाखला देत अर्ज अवैध ठरवला. मात्र, चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद केल्याचा आरोप नितीन जैन यांनी केला आहे.
नितीन जैन यांनी शिवसेनेतर्फे प्रभाग 14 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाच्या एबी फॉर्ममध्ये त्यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. छाननीसाठी सकाळी 11 वाजता प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते नगराध्यक्ष पदासाठीचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनातही उपस्थित होते.
जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या एबी फॉर्मवरील पहिल्या क्रमांकावरील संजना चंद्रकांत पाटील आणि दुसऱ्या क्रमांकावरील भारतीय छोटू भोई यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. मात्र, प्रभाग क्रमांक 14 च्या छाननीदरम्यान मात्र त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.
या निर्णयाविरोधात नितीन जैन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत न्याय मिळवण्यासाठी पुढील कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

