Top 5 This Week

Related Posts

राष्ट्रीय मतदार दिन मलकापूर येथे उत्साहात साजरा एसआयआर-२०२६ साठी सज्ज राहण्याचे तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

मलकापूर : भारत निवडणूक आयोगाच्या स्थापनेनिमित्त दरवर्षी साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय मतदार दिन यावर्षीही मलकापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली असून, २०११ पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जात आहे. मतदारांमध्ये विशेषतः नवमतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करणे, मतदार यादीत नाव नोंदणीस प्रोत्साहन देणे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढवणे हा या दिनामागील मुख्य उद्देश आहे.

यावर्षी २५ जानेवारी २०२६ रोजी १६ वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत असून, २१-मलकापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रे, शाळा-महाविद्यालये तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदार दिनासाठी “माझा भारत, माझे मत” ही संकल्पना दिली आहे.

राष्ट्रीय मतदार दिन सार्वजनिक सुटीच्या दिवशी येत असल्याने, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार दिनाची शपथ दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली. त्यानुसार आज तहसिल कार्यालय, मलकापूर येथील सभागृहात तहसिलदार समाधान सोनवणे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, २१-मलकापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ देण्यात आली. यावेळी त्यांनी लवकरच राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ (एसआयआर-२०२६) बाबत सविस्तर मार्गदर्शन करत सर्व अधिकारी, कर्मचारी व सेतू केंद्रचालकांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

एसआयआर-२०२६ अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सेवक, ग्रामपंचायत अधिकारी तसेच स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी सन २००२ च्या मतदार यादीतील नावे शोधण्याची प्रक्रिया तसेच मतदार यादी डाउनलोड करण्याबाबत सी. पी. पाटील, सहाय्यक महसूल अधिकारी, सामान्य निवडणूक विभाग आणि संजीव वैराळे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली.

या कार्यक्रमास पी. पी. घोटकर, नायब तहसिलदार निवडणूक, व्ही. एस. चव्हाण, नायब तहसिलदार, एन. एम. राठोड, नायब तहसिलदार महसूल, डॉ. चारुशिला चौधरी, निवासी नायब तहसिलदार, धनश्री हरणे, निरीक्षण अधिकारी तसेच तहसिल व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी. डी. भारंबे, सहाय्यक महसूल अधिकारी, जी. यु. खुळे, नायब नाझर, सचिन चोपडे, महसूल सेवक व तहसिल कार्यालयातील शिपाई वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles