रावेर अतीक खान
रावेर तालुक्यात आयटी पार्क उभारण्याच्या मागणीला पुन्हा वेग आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विकासाभिमुख विचारवंत श्री. प्रशांत बोरकर यांनी रावेरमध्ये आयटी पार्क व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, अलीकडच्या घडामोडींमुळे ही चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.
राज्यात पुण्यानंतर आयटी क्षेत्राची वाढ मोठ्या प्रमाणात केंद्रीत होत असल्याने त्याचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचे बोरकर यांनी अनेकदा मांडले आहे. त्यांच्या मते जळगाव जिल्ह्यातील रावेरसारख्या तालुक्यांत आयटी पार्क उभारल्यास रोजगारनिर्मिती व औद्योगिक विकासास मोठी चालना मिळू शकते.
दरम्यान, बिहारमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आयटी पार्कसाठी विशेष धोरण जाहीर केल्यानंतर देशभरात या विषयावर चर्चा रंगली होती. त्यानंतर महाराष्ट्रातही आयटी पार्क उभारणीला वेग आला. नाशिकचे तत्कालीन खासदार हेमंत गोडसे यांनी तातडीने पुढाकार घेत आपल्या मतदारसंघात 100 एकर जागा तीन-चार दिवसांत मंजूर करून घेतली. त्या काळात श्री. बोरकर यांनी खासदारांचे स्वीय सहायक मंडलिक साहेब यांच्याशी आयटी पार्कसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा केली होती.
याच धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातही बोरकर यांनी आयटी कंपन्यांसाठी प्रस्ताव तयार करून काही कंपन्यांशी तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा केली. मात्र, स्थानिक पातळीवर आवश्यक सहकार्य न मिळाल्याने प्रक्रिया पुढे न जाण्याची खंत व्यक्त होत आहे. नगरपालिकेकडून चर्चेसाठी हॉलदेखील उपलब्ध करून देण्यात आला नाही, असेही सांगितले जाते.
श्री. बोरकर यांनी यापूर्वीही रावेर तालुक्यासाठी अनेक विकासकामांची मागणी केली होती. त्यावेळी रावेरसाठी केलेल्या अनेक मागण्या जिल्ह्यातील इतर भागांत मंजूर झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे—जसे एसटीडी टेलिफोन व्यवस्था, टीव्ही टॉवर, इलेक्ट्रिक बस सेवा, रेल्वे गाड्या सुरू करणे इत्यादी. त्यांच्या मते, या मागण्यांमुळे इतर भागातील लोकप्रतिनिधी तत्परतेने पुढाकार घेतात, परंतु रावेर मात्र मागे पडतो.
रावेरच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, तसेच जनतेनेही विकासाच्या मुद्द्यांवर सजग राहावे, असे मत श्री. प्रशांत बोरकर सोशल मीडियावरून सातत्याने मांडत आहेत.
रावेरमध्ये आयटी पार्कसाठीची मागणी नव्याने जोर धरत असून पुढील काळात या दिशेने ठोस पावले उचलली जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



