मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी आणलेले पाच लाख रुपये चोरणारा आंतरराज्यीय चोर जेरबंद, रक्कम जप्त

मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी आणलेले पाच लाख रुपये चोरणारा आंतरराज्यीय चोर जेरबंद, रक्कम जप्त
Advertisement

बुलढाणा : शेतकरी पित्याने मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी आणलेले पाच लाख रुपये चोरणाऱ्या आंतरराज्यीय बॅग लिफ्टरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून संपूर्ण रक्कम हस्तगत केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. ही घटना दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी घडली होती. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादी नितीन जिजेबा पव्हाड, रा. रिसोड, जि. वाशीम हे शेतकरी असून त्यांची मुलगी श्रुती हिचे बुलढाणा येथील राजश्री शाहू कॉलेजमध्ये बी.ए.एम.एस. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाला होता. कॉलेजची फी भरण्यासाठी त्यांनी मेहकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियातून पाच लाख रुपये काढले व कारने बुलढाण्यात कॉलेज परिसरात पोहोचले. कार पार्क करून कॉलेजमध्ये गेले असता अज्ञात आरोपींनी कारचा काच फोडून आत ठेवलेली रक्कम चोरून नेली.

Advertisement

या घटनेमुळे शेतकरी कुटुंबावर मोठा आर्थिक आघात झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपी आंतरराज्यीय बॅग लिफ्टिंग व वाहनांची काच फोडून चोरी करणारे सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथे वास्तव्यास असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने शिवमोगा येथे सलग पाच दिवस शोधमोहीम राबवून मुख्य आरोपी सुनील उर्फ बालू रामू बोवी (वय ३२, रा. भद्रावती, जि. शिवमोगा, कर्नाटक) याला ताब्यात घेतले.

तपासात आरोपीने हा गुन्हा त्याचा भाऊ विष्णू रामू बोवी याच्यासोबत केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले संपूर्ण पाच लाख रुपये हस्तगत करण्यात आले असून पुढील कारवाईसाठी आरोपीला बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीवर विविध राज्यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here