संदीप जोगी… मुक्ताईनगर…..
पट्टेदार वाघाचे अस्तित्व असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनपरिक्षेत्र हद्दीमधील डोलारखेडा फाटा ते नांदवेल फाट्यादरम्यान गुरुवारी मध्यरात्री बारा साडेबारा वाजेच्या दरम्यान गस्त घालत असलेल्या मुक्ताईनगर येथील महसूल विभागाच्या पथकाला रस्त्यावर पट्टेदार वाघाचे दर्शन घडले
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा वडोदा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू वाहतूक होत असते. गेल्या महिन्याभरात महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई देखील केलेली आहे. गुरुवारी मुक्ताईनगर येथून वडोदा कडे महसूल विभागाचे पथक तहसीलदार गिरीश वखारे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त साठी गेले होते. मुक्ताईनगर कडे परतीच्या प्रवासात रात्री बारा साडेबारा वाजेच्या दरम्यान नांदवेल चिंचखेडा फाटा ते डोलारखेडा फाट्या दरम्यान चार चाकी वाहनातून जात असलेले महसूल पथकातील तलाठी अमित इंगळे, नितीन उपराटे, विशाल जाधव ,सोमनाथ बोराटकर, वैभव काकडे ,विलास गायकी यांना गाडीच्या समोर रस्ता ओलांडताना पट्टेदार वाघ दिसून पडला. पुढे वाघाने रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये गेला व नंतर परत बाहेर आला नंतर पुन्हा डोलारखेडा फाट्याकडे रस्त्यावरून चालत वाघाने पुढे जंगलामध्ये धाव घेतली. पट्टेदार वाघाचा थरार प्रसंग सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी पाच ते सात मिनिटे बघितल्याचे तलाठी अमित इंगळे यांनी सांगितले.
मुक्ताईनगर महसूल विभागाच्या पथकाला गुरुवारी मध्यरात्री गस्त घालत असताना नांदवेल फाटा ते डोलारखेडा फाट्यादरम्यान पट्टेदार वाघाचे दर्शन झालेले आहे. नागरिकांनी उघड्यावर रात्रीच्या वेळेस शोचास बसू नये, रात्री शेतात जाऊ नये, रात्री फिरताना नागरिकांनी गटाने फिरावे यासह अन्य विषयीच्या सूचनांचे पत्र परिसरातील सर्व तलाठी व ग्रामसेवक यांना देण्यात आलेले असल्याचे वडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे यांनी सांगितले.





