मिशन परिवर्तन अंतर्गत निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सोहळा उत्साहात

Advertisement

बुलढाणा : अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीसाठी जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “मिशन परिवर्तन” उपक्रमांतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सोहळा पोलीस मुख्यालय, बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून दि. 26 जून 2025 पासून जिल्ह्यात व्यापक प्रमाणात अंमली पदार्थविरोधी अभियान सुरू असून, या उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. 8 नोव्हेंबर रोजी आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

Advertisement

कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड, तसेच जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. रणजितसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान

जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतून हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध श्रेणीतील विजेत्या विद्यार्थ्यांना मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. लोणार, धाड, खामगाव, चिखली, अमडापूर, नांदुरा, संग्रामपूर, देऊळगाव राजा, जानेफळ, बुलढाणा ग्रामीण आणि बुलढाणा शहर यांसह सर्व पोलीस ठाण्यांतील विजेते विद्यार्थी या सन्मानासाठी उपस्थित होते.

परिक्षकांचा विशेष गौरव

निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे परिक्षण करणारे श्री. पठाण सर, डॉ. गायत्री सावजी, डॉ. शिवशंकर गोरे, डॉ. शिवाजी देशमुख, किरण वाघमारे यांसह अन्य परिक्षकांचेही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. गवई यांच्या पथकाने सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले. यानंतर पोनि. श्री. सुनिल अंबुलकर यांनी प्रास्ताविक करत मिशन परिवर्तनाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे म्हणाले की,
“व्यक्तीच्या आयुष्यात मेहनत हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. मेहनतीच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित मिळते.”
तसेच त्यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, शिस्तीचे महत्व आणि नशामुक्त समाजनिर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. सर्व उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.

अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड यांनी मिशन परिवर्तन अंतर्गत जिल्हा पोलीस दलाने राबविलेले उपक्रम मांडले. अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी जिल्ह्यातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करून पोलीस दलासोबत पुढील विविध उपक्रम राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.

प्रमुख उपस्थिती

कार्यक्रमाला पोनि. सुनिल अंबुलकर, पोनि. रवि राठोड, पोनि. बाळकृष्ण पावरा, पोनि. गजानन कांबळे, सपोनि. दिपक ढोमणे, विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच जिल्ह्यातील पत्रकार सज्जन, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गायत्री सावजी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मृणाल सावळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थागुशा बुलढाणा आणि पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Subscribe to Viral News Live