बुलढाणा : जिल्ह्यात विविध कारणांमुळे महिला हरविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने वर्ष २०२५ मध्ये हरविलेल्या महिलांच्या शोधामध्ये महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने नोंद झालेल्या महिला हरविल्याच्या प्रकरणांपैकी सुमारे ८७ टक्के महिलांचा यशस्वी शोध लावला आहे.
महिला हरविण्याच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस नियंत्रण कक्ष, बुलढाणा येथे विशेष “महिला मिसिंग डेस्क” सुरू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये “मिसिंग सेल” कार्यान्वित करण्यात आले असून या माध्यमातून हरविलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.
महिला मिसिंग डेस्क आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील मिसिंग सेल यांच्या समन्वयातून हरविलेल्या महिलांच्या प्रकरणांचा नियमित आढावा घेतला जात आहे. वर्ष २०२५ मध्ये नोंद असलेल्या एकूण महिला हरविल्याच्या प्रकरणांपैकी तब्बल ८७ टक्के महिलांचा शोध घेण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. या कामगिरीमुळे हरविलेल्या महिलांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, सन २०२१ पासून आजपर्यंत जिल्ह्यात महिला हरविल्याची एकूण २८४ प्रकरणे प्रलंबित असून या सर्व महिलांचा शोध घेण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या समन्वयातून या प्रकरणांचा तपास वेगाने करण्यात येत असून हरविलेल्या महिलांचा शोध लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.




