
बुलढाणा जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, त्यांची वाहतूक तसेच जुगारासारख्या अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत चार आरोपींविरुद्ध गुन्हे नोंद केले असून एकूण 1 लाख 4 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 9 मार्च 2026 रोजी देऊळगाव राजा, तामगाव आणि लोणार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आली.
जिल्ह्यात अवैध शस्त्रांची चोरटी वाहतूक व विक्री तसेच वरली मटका आणि इतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके तयार करून विविध ठिकाणी कारवाई सुरू केली.
याच कारवाईदरम्यान देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनता जिनिंगसमोर नाकाबंदी करून राहुल भास्कर झोरे (वय 33, रा. माळीपुरा, साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे असलेल्या एमएच-12-जीएफ-8067 क्रमांकाच्या वाहनात गुप्ती तलवार आढळून आली. पोलिसांनी आरोपीकडून एक गुप्ती तलवार किंमत 1 हजार रुपये आणि पांढऱ्या रंगाची चारचाकी कार किंमत 1 लाख रुपये असा एकूण 1 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
तसेच जुगारविरोधी कारवाईत तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्राम पातुर्डा येथील मच्छी मार्केट परिसरात तितली भवरा जुगारावर कारवाई करून भिमराव श्रावण खंडेराव (वय 55, रा. पातुर्डा खु., ता. संग्रामपूर) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून 1 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच पातुर्डा आठवडी बाजार परिसरात वरली मटका जुगारावर कारवाई करून बाळकृष्ण सोनाजी भानगे (वय 50, रा. पातुर्डा, ता. संग्रामपूर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून वरली मटका साहित्य व रोख रक्कम असा एकूण 1 हजार 455 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान लोणार पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोणार बसस्थानकाजवळ वरली मटका जुगारावर कारवाई करून अलियार खान बशारत खान (वय 42, रा. आझादनगर, लोणार) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून वरली मटका साहित्य व रोख रक्कम मिळून 1 हजार 105 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिन्ही प्रकरणांमध्ये तामगाव व लोणार पोलीस ठाण्यांत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एकूण कारवाईत एका अवैध शस्त्र प्रकरणासह जुगार कायद्यांतर्गत तीन प्रकरणांमध्ये चार आरोपींविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले असून एक तलवार, एक चारचाकी वाहन तसेच जुगार साहित्य व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 4 हजार 860 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, प्रताप बाजड, सहायक फौजदार राजेंद्र अंभोरे, ओमप्रकाश सावळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद गिरी, एजाज खान, पुरुषोत्तम आघाव तसेच पोलीस कर्मचारी अमोल शेजोळ, दिपक वायाळ, अजीस परसुवाले, मनोज खरडे, निलेश राजपूत आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा जाधव यांचा समावेश होता.





