Top 5 This Week

Related Posts

प्रा. ॲड. कौस्तुभ चंद्रवदन इंगळे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची ‘आचार्य’ (पीएच.डी.) पदवी जाहीर

मलकापूर : येथील जनता कला व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक प्रा. ॲड. कौस्तुभ चंद्रवदन इंगळे यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्याकडून वाणिज्य शाखेतील ‘आचार्य’ (पीएच.डी.) ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण मलकापूर परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

प्रा. इंगळे यांनी “पश्चिम विदर्भातील संघटित व असंघटित कामगारांचे ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रियांचे अध्ययन : विशेष संदर्भ – बुलढाणा जिल्हा (२००५ ते २०२०)” या विषयावर सखोल संशोधन सादर केले होते. या प्रबंधामध्ये त्यांनी ग्रामीण व शहरी भागातील कामगारांच्या आर्थिक स्थितीचा तुलनात्मक अभ्यास करत वेतनातील असमानता, रोजगाराची अनिश्चितता, सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी तसेच विकासातील असमतोल या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर प्रकाश टाकला आहे.

हे संशोधन जनता कला व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे सदस्य व संशोधन मार्गदर्शक डॉ. प्रशांत बी. खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले. दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मौखिक परीक्षेसाठी (Viva-Voce) मुंबई येथील के.पी.बी. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सचे संशोधन केंद्र प्रमुख डॉ. कुलदीप शर्मा हे बाह्य परीक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्रा. इंगळे यांच्या संशोधनाची शास्त्रीय पातळी, अभ्यासातील सखोलता आणि सामाजिक उपयुक्ततेचे विशेष कौतुक केले. त्यानंतर विद्यापीठाने अधिसूचना क्रमांक ७३४/२०२५ अन्वये त्यांना ‘आचार्य’ पदवी बहाल केली.

प्रबंधामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोकसंख्या, रोजगाराच्या संधी, स्थलांतराची वाढती समस्या आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक परिणाम यांचे सखोल सांख्यिकीय विश्लेषण करण्यात आले आहे. जिल्ह्यात स्थानिक रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे मोठ्या प्रमाणावर तरुणांचे पुणे, मुंबईसारख्या महानगरांकडे स्थलांतर होत असून, त्यामुळे ग्रामीण भागात वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण वाढत असल्याचे वास्तव या संशोधनातून समोर आले आहे. तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांची असुरक्षित अवस्था आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत असलेली क्षेत्रनिहाय तफावत यावरही या प्रबंधात ठोस निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.

या संशोधनातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील असंघटित कामगारांपर्यंत पोहोचताना येणाऱ्या अडचणी, यंत्रणांमधील त्रुटी आणि त्याचा कामगारांच्या आर्थिक विकासावर होणारा परिणाम स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे. त्यामुळे हे संशोधन भविष्यात जिल्हास्तरावरील रोजगार धोरणे ठरविण्यासाठी तसेच सामाजिक व आर्थिक अभ्यासासाठी उपयुक्त ठरणारे आहे.

प्रा. इंगळे यांना संशोधन कार्य पूर्ण करताना लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अरविंदजी कोलते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर डी. चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यासह प्रा. डॉ. पी. एन. लढे, प्रा. डॉ. एस. एल. माळी, प्रा. डॉ. एल. जी. कोलते, प्रा. डॉ. योगेश एन. सरदार, प्रा. डॉ. आर. आर. जोशी, प्रा. डॉ. पूनम काबरा, ग्रंथपाल डॉ. डी. एम. धुमाळे, अधीक्षक शंकर गवळे व लेखापाल अतुल कोलते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

आपल्या यशाचे श्रेय प्रा. इंगळे यांनी संशोधन मार्गदर्शक, महाविद्यालयीन सहकारी तसेच आपले आई-वडील श्रीमती मालती इंगळे व श्री. चंद्रवदन इंगळे यांना दिले आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Zafar Khan
Zafar Khanhttps://viralnewslive.in
Zafar Khan Athar Khan is the Editor-in-Chief of Viral News Live, a daily newspaper covering news from Buldhana district and across Maharashtra. He is an active journalist committed to public interest reporting, focusing on local governance, crime news, social issues, and matters affecting the common people. He currently serves as the District President of Voice of Media (Urdu Wing) in Buldhana and works to strengthen responsible journalism and raise important public issues through independent media. Contact Information Email: zafar@viralnewslive.in Mobile: +91 9881850730

Popular Articles