मलकापूर : पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयातील डिप्लोमा पॉलिटेक्निक (बॅच २०२४–२५) विद्यार्थ्यांचा १२ वा पदविका प्रदान सोहळा ७ मार्च २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात एकूण ८५ विद्यार्थ्यांना डिप्लोमा पदविका प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या आनंददायी क्षणाचे साक्षीदार म्हणून त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व अध्यापन व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.विशेष म्हणजे महाराष्ट्रातील डिप्लोमा शिक्षण संस्थांमध्ये पदविका वितरण सोहळ्याचे आयोजन करणारे हे पहिले महाविद्यालय असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील माजी प्राध्यापक डॉ. व्ही. एस. पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगाव येथील कार्यकारी अभियंता श्री एकनाथ तळेले उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी भूषविले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अरविंद कोलते तसेच खजिनदार श्री सुधीरभाऊ पाचपांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, उपप्राचार्य प्रा. संदीप खाचणे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. त्यामध्ये प्रा. गजानन सुपे, प्रा. महेश शास्त्री, प्रा. साकेत पाटील, प्रा. जयप्रकाश सोनोने आणि प्रा. मनोज वानखेडे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संयोजक म्हणून प्रा. गणेश माळी यांनी संपूर्ण पदविका प्रदान सोहळ्याचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशिष हाताळकर यांनी प्रभावी शैलीत केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी प्रमुख अतिथी डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तांत्रिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसमोर आज मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, मेहनत आणि सातत्य यांचा आधार घेत आपल्या कौशल्यांचा विकास करावा आणि देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे. तसेच कार्यकारी अभियंता तळेले यांनीही विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले आणि तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासात सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. खर्चे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, पदविका प्रदान सोहळा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण देण्याचा नेहमीच प्रयत्न केला असून भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातील. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण, संशोधन व उद्योगक्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रेरित केले. विद्यार्थ्यांनी पदविका स्वीकारताना अत्यंत आनंद आणि अभिमान व्यक्त केला. या सोहळ्याला उपस्थित पालकांनीही आपल्या मुलांच्या यशाचा आनंद व्यक्त करत महाविद्यालयाच्या कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. पांडुरंग भिसे यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील अध्यापन व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या पदविका प्रदान सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक यशाचा सन्मान मिळाला असून पुढील आयुष्यात नव्या संधींच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळाली.






