
पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील दोन नामांकित उद्योगांना शैक्षणिक औद्योगिक भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी इनोव्हेटिव्ह मेटल क्राफ्ट (चाकण, पुणे) आणि पाटील ऑटोमेशन (पुणे) या संस्थांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले. या औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना उत्पादनाची संपूर्ण प्रक्रिया, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान, स्वयंचलन प्रणाली, गुणवत्ता नियंत्रणाची आधुनिक पद्धती तसेच उद्योगातील प्रत्यक्ष कामकाज आणि व्यावहारिक अनुभव यांची सखोल माहिती मिळाली. उद्योगातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला आणि आधुनिक तंत्रज्ञानातील उपलब्ध संधी, उद्योगात आवश्यक असणारी कौशल्ये, भविष्यातील करिअरच्या विविध दिशा आणि नोकरीच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.
विशेष बाब म्हणजे, इनोव्हेटिव्ह मेटल क्राफ्ट या कंपनीने महाविद्यालयासोबत सामंजस्य करार (एम. ओ. यू.) करण्यास उत्सुकता दाखवली असून, त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी (प्लेसमेंट) आणि प्रशिक्षणाच्या संधी (इंटर्नशिप) उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच पाटील ऑटोमेशन या संस्थेनेही विद्यार्थ्यांना नोकरी आणि प्रशिक्षण देण्याबाबत सकारात्मक आणि सहकार्याची भूमिका स्पष्ट केली आहे. ही संपूर्ण औद्योगिक भेट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे आणि प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, प्रा. रमाकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. संतोष शेकोकर यांच्या सहकार्याने ही भेट आयोजित करण्यात आली होती. भेटीचे संपूर्ण समन्वय आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन प्रा. दीपक खरात यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले तसेच या भेटीचे नियोजन करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पांडुरंग चोपडे यांची पण मदत मिळाली.
या औद्योगिक भेटीचा विद्यार्थ्यांवर खूप सकारात्मक परिणाम झाला आहे. प्रत्यक्ष उद्योगातील वातावरण पाहून, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि प्रक्रिया अनुभवल्याने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ही भेट जीवनातील खूप महत्त्वाची आणि उपयुक्त अनुभव असल्याचे सांगितले. पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय सतत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या औद्योगिक भेटी, प्रशिक्षण आणि उद्योगांशी जोडणीचे प्रयत्न करत आहे. असे प्रतिपादन महावियलायचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील, सचिव डॉ. अरविंद कोलते व खजिनदार श्री. सुधीर पाचपांडे यांनी यावेळी केले.





