बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती उत्खननावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाची धडक मोहीम सुरू असून, त्याअंतर्गत देऊळगांव राजा हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी 88 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.


अवैध उत्खनन थांबवण्याचे SP निलेश तांबे यांचे कठोर निर्देश
जिल्ह्यात विनापरवाना व अवैधरित्या गौण खनिज (रेती) उत्खनन तसेच चोरटी वाहतूक थांबवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे यांनी सर्व पोलीस पथकांना कठोर कारवाईचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. श्री. सुनिल अंबुलकर यांनी स्वतंत्र पथक तयार करून रेती तस्करीविरोधात गुप्त तपास आणि कारवाईचे नियोजन सुरू केले.
गोपनीय माहितीवरून जलाशय परिसरात छापा
दि. 11 डिसेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की देऊळगांव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील सुलतानपूर शिवारात संत चोखामेळा जलाशयात काही इसम बोटींच्या साहाय्याने चोरटी रेतीचे उत्खनन करत आहेत.
यानंतर पोनि. सुनिल अंबुलकर यांनी पथकासह जलाशय परिसरात धाड टाकली. तपासादरम्यान बोटींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रेतीचे चोरटी उत्खनन चालू असल्याची खात्री झाली.
धडक कारवाई; पाण्यात उड्या मारून पोलिसांनी पकडल्या सात बोटी
पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच काही तस्कर दुसऱ्या बोटींच्या मदतीने पळून गेले. मात्र स्था.गु.शा.च्या पथकातील पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जलाशयात उड्या मारून सात बोटी ताब्यात घेतल्या.
या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
- बोटी – 07
- पाण्याचे इंजिन व सिलेंडर
- शेगडी
- रेती/वाळू – 4 ब्रास
जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ₹88,40,000 इतकी आहे.
संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी देऊळगांव राजा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता तसेच गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सहभागी आरोपी पळून गेले असून त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, तसेच
- श्री. श्रेणिक लोढा – अपर पोलीस अधीक्षक, खामगाव
- श्री. अमोल गायकवाड – अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा
- श्रीमती मनिषा कदम – उपविभागीय पोलीस अधिकारी, देऊळगाव राजा
यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी:
पोनि. सुनिल अंबुलकर, पोउपनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, दिगंबर कपाटे, पोकॉ. अमोल वनारे, निलेश राजपुत, मनोज खरडे, दीपक वायाळ, चापोहेकॉ. विकास देशमुख, चापोकॉ. निवृत्ती पुंड (स्थानीय गुन्हे शाखा बुलढाणा), तसेच पोनि. ब्रम्हा गिरी आणि देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचा स्टाफ.






