दिव्यांग आणि सामाजिक सुरक्षा योजनांसाठी हयात प्रमाणपत्र अनिवार्य; शासनाचा नवीन निर्णय लागू – तहसीलदार गिरीष वखारे यांची माहिती

0
31
Advertisement

मुक्ताईनगर प्रतिनिधी :…… सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज आता दिव्यांग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आले असून, सर्व दिव्यांग व्यक्तींनी वैश्विक दिव्यांगत्व ओळखपत्र (UDID) आधार संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या बदलाबाबत मुक्ताईनगर तहसील कार्यालयामार्फत सर्व लाभार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
तहसीलदार गिरीष वखारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र पुरस्कृत सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत मिळणाऱ्या—
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना
या सर्व योजनांमधील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate – DLC) निर्धारित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने सादर करणे अत्यावश्यक आहे.
यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या सेतु सुविधा केंद्र, ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन हयात प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करावी. शासनाने उपलब्ध करून दिलेले Beneficiary Satyapan App मोबाईलमध्ये डाउनलोड करून, त्या अॅपच्या माध्यमातून लाभार्थ्यांचा फोटो काढून हयात प्रमाणपत्र ऑनलाईन सबमिट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सबमिट केलेल्या प्रमाणपत्राची एक प्रत संजय गांधी निराधार योजना शाखा, तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे जमा करणे आवश्यक आहे.
तहसील प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, लाभार्थ्यांची यादी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. हयात प्रमाणपत्र भरण्यात किंवा अन्य तांत्रिक अडचणींमध्ये कोणतीही समस्या आल्यास संबंधित तलाठी किंवा महसूल सेवक (कोतवाल) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार गिरीश वखारे यांनी केले आहे.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here