मुक्ताईनगर प्रतिनिधी: ….
जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाच्या सहापदरीकरण करण्याच्या मुद्द्यावर आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरले. खडसे यांच्या या आक्रमक पाठपुराव्यामुळे अखेर सरकारने या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले असून, १०५ किलोमीटरचा हा ‘खान्देश एक्सप्रेस’ मार्ग लवकरच समृद्धी महामार्गाला जोडला जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सभागृहात दिली.
विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान जळगाव जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांवर बोलताना एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या घोषणेची आठवण करून दिली. खडसे म्हणाले की, “माननीय मुख्यमंत्री जेव्हा जळगाव दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा रस्ता सहा पदरी करून तो ‘स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’ला जोडण्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा होऊन बराच काळ उलटला असूनही अद्याप यावर ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. हा रस्ता नेमका कधी पूर्ण होणार? राज्य सरकार या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी काय करत आहे?” असा थेट सवाल खडसे यांनी उपस्थित केला.खडसे यांनी जळगाव आणि खान्देशच्या विकासासाठी हा रस्ता किती कळीचा आहे, हे सांगतानाच सरकारच्या दिरंगाईवरही बोट ठेवले.
एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की, जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या १०५ किलोमीटर लांबीच्या महामार्गाला ‘खान्देश एक्सप्रेस’ असे नाव देण्यात आले आहे. हा मार्ग सहा पदरी स्वरूपाचा असून तो थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. सध्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा अहवाल पूर्ण झाल्यानंतर तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.
हा रस्ता पूर्ण झाल्यास जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर अत्यंत कमी वेळेत कापता येईल
जळगावचा शेतीमाल आणि केळी थेट समृद्धी महामार्गामार्गे मुंबई-नागपूर सारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत जलद गतीने पोहोचू शकेल.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांच्यातील व्यापार आणि दळणवळणाला मोठी गती मिळेल असे आ. एकनाथराव खडसे यांनी सांगितले तसेच हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे सांगितले.
आमदार एकनाथराव खडसे यांनी सभागृहात दाखवलेल्या या तत्परतेमुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. आता सरकार या प्रकल्पाचा डीपीआर कधी पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




