advertisement
Home Jalgaon jamod जळगाव जामोद येथे देशी बनावटीचे पिस्टलसह तिघांना अटक; १ लाख २२ हजारांचा...

जळगाव जामोद येथे देशी बनावटीचे पिस्टलसह तिघांना अटक; १ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
जळगाव जामोद येथे देशी बनावटीचे पिस्टलसह तिघांना अटक; १ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने १ एप्रिल २०२६ रोजी धाड टाकून देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना अटक केली. आरोपींकडून पिस्टल, जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आगामी सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या सोनाळा, तामगाव आणि जळगाव जामोद या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध अग्नीशस्त्रांची तस्करी, खरेदी-विक्री आणि बेकायदेशीर साठा रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष कारवाईचे आदेश दिले होते.

या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी पथके तयार करून गुप्त माहितीच्या आधारे कारवाई सुरू केली. १ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, जळगाव जामोद हद्दीतील श्रीमंत ढाबा परिसरात काही जण बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी आले आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून पवन इंदरसिंग डावर (वय २३), संजय भिलासिंग बोडल (वय २०) आणि रमेश दुर्गासिंग बारेला (वय २४) यांना ताब्यात घेतले.

आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह, दोन जिवंत काडतुसे आणि एक होंडा शाईन मोटारसायकल असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस हवालदार गणेश पाटील यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टच्या कलम ३, ५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२३ आणि १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस कर्मचारी दीपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पाटील आणि आशा मोरे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या केली. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस ठाणे करीत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version