कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सात दिवशीय रासेयो शिबीर नरवेलमध्ये संपन्न

Advertisement

मलकापूर : स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष सातदिवसीय श्रम संस्कार शिबीर नुकतेच नरवेल येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले. दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नरवेल येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रमुख पाहुणे सरपंच प्रणाली कोलते व उपसरपंच अजय नावकर यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी भूषवले. यावेळी प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूएसी अधिकारी प्रा. रमाकांत चौधरी, गावातील प्रमुख गिरीश कोलते, सचिन पाटील, नरवेल शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख व रवींद्र होळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले व गावकरी, रासेयो स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच प्रणाली कोलते व उपसरपंच अजय नावकर यांनी विद्यार्थ्यांना गावातील समस्या व त्यावर उपाययोजना याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांनी पाणलोट व्यवस्थापन विकासाचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून दिले. डॉ. युगेश खर्चे यांनी शिबिराद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वसमावेशक विकास साध्य होतो, पडीत जमीन कशी उपयोगात आणावी व सातदिवसीय निवासी शिबिरामुळे शिस्तप्रियता व नेतृत्वगुण विकसित होतात याबाबत उल्लेखनीय मार्गदर्शन केले. प्रा. रमाकांत चौधरी यांनी व्यक्तिविकासाचा मार्ग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना असा मनोगत व्यक्त करून सर्वांना प्रोत्साहन दिले व सर्वांनी शिबिराला शुभेच्छा देऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन बोरले यांनी प्रास्ताविकात शिबिराचे नियोजन, उद्देश व सातदिवसीय आराखडा स्पष्टपणे सांगितला, तर सूत्रसंचालन कुमारी रोहिणी खर्चे यांनी कुशलतेने केले. शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती, माझा कचरा माझी जबाबदारी, ग्रामस्वच्छता, स्मशानभूमी स्वच्छता, झाडे लावा झाडे जगवा, शाळा बाह्य सर्वे, अंधश्रद्धा निर्मूलन, पाणी अडवा पाणी जिरवा, ग्रो ग्रीन कॅम्पेनिंग, सेव्ह एनर्जी, आजाराविषयी जनजागृती, स्वच्छ भारत सुंदर भारत, विकसित भारत सशक्त भारत, महिला सक्षमीकरण, घर घर संविधान, सरकारी रुग्णालय स्वच्छता असे विविध उपक्रम उत्साहाने राबविले, ज्यामुळे गावाला एक नवीन ऊर्जा मिळाली. बौद्धिक सत्रात प्रा. रमाकांत चौधरी व प्रा. पांडुरंग चोपडे यांनी २५ फेब्रुवारी रोजी युवा विकासासाठी पाणलोट व्यवस्थापन व पडीत जमीन विकासावर मार्गदर्शन केले, तर बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील अजय कांडेलकर यांनी मानसिक आरोग्यावर बोलले. २६ फेब्रुवारी रोजी मलकापूर येथील डॉ. धनंजय जोशी यांनी आरोग्य मार्गदर्शन व डॉ. ज्ञानेश्वर इंगळे यांनी एड्स व मलेरिया याबाबत मार्गदर्शन केले, तसेच संध्याकाळी अर्णव नेत्रालयामार्फत नेत्र तपासणी शिबिर राबविले. रात्री लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे खजिनदार सुधीर पाचपांडे व प्राचार्य प्रा. सदाशिव लवंगे यांनी सदिच्छा भेट देऊन स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले. २७ फेब्रुवारी रोजी मलकापूर येथील प्रा. एस. एस. शुक्ला यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जीवन व कार्यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर कार्यक्रम अधिकारी प्रा. दीप्ती लढे व प्रा. शिवानी खेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावात ग्राहक शिक्षण, किसान कार्ड, जलसंवर्धन, बेटी बचाओ बेटी पढाओ, शिव्या मुक्त समाज अभियान यावर जनजागृती रॅली काढली. २८ फेब्रुवारी रोजी लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अरविंद कोलते, प्राचार्य डॉ. खर्चे, मलकापूर तालुकाध्यक्ष बंडू चौधरी व कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्गदर्शनात निरोप समारंभ उत्साहपूर्णपणे पार पडला, तर १ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता सर्व स्वयंसेवकांनी शिबिराचा भावपूर्ण निरोप घेतला. या शिबिराने नरवेल गावाला केवळ स्वच्छता नव्हे, तर सामाजिक जागृतीचा हिरवा चेहरा दिला असून, विद्यार्थ्यांच्या उत्साहाने सर्वांनाच प्रेरणा मिळाली.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here