मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, दिनांक २ फेब्रुवारीच्या रात्री अरविंद प्रभाकर पाटील यांच्या शेतातून चार गाई चोरीस गेल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दिनांक ३ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे पावणे पाच वाजता अरविंद पाटील यांचे पुत्र भूषण पाटील शेतात गेले असता, शेतातील सात गाईंपैकी चार गाई आढळून न आल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीची खात्री होताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
चोरीस गेलेल्या गाईंचा शोध घेण्यासाठी पाटील कुटुंबीयांनी बोरगाव, ब्रह्मपुर, लोणी, बहादरपूर आदी परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
चोरीस गेलेल्या प्रत्येकी गाईची किंमत सुमारे ६० ते ७० हजार रुपये असून, एकूण अंदाजे अडीच लाख रुपयांचे महागडे पशुधन चोरीस गेल्याने अरविंद पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर या घटनेमुळे आणखी आर्थिक ओझे आले आहे.
विशेष म्हणजे, अंतुर्ली गावात गेल्या एक ते दोन महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी एकाच दिवसात चार ते पाच चोऱ्या झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच नुकत्याच पार पडलेल्या यात्रेदरम्यान एका महिलेची पर्स चोरीस गेल्याची घटनाही समोर आली होती.
दरम्यान, अंतुर्ली परिसरात अवैध सट्टा पत्त्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पत्ते खेळण्यासाठी परप्रांतीय व अनोळखी व्यक्तींचा गावात संशयास्पद वावर वाढल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
“एवढ्या वर्षांत जेवढ्या चोऱ्या झाल्या नाहीत, तेवढ्या चोऱ्या अवघ्या एक-दोन महिन्यांत होत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. वाढत्या चोऱ्यांवर तातडीने आळा घालावा, अंतुर्ली गावात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी व संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून पोलीस प्रशासनाकडे करण्यात येत आहे.






