मुक्ताईनगर प्रतिनिधी:….. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी अंगणवाडीतील पोषण आहाराच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. सध्या अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा पाकीटबंद आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून, हा केवळ कंत्राटदारांचे भले करण्यासाठी सुरू असलेला प्रकार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी विधानपरिषदेत केला.
आमदार खडसे यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना अंगणवाडीतील पोषण आहाराची पोलखोल केली. ते म्हणाले की, “सध्या अंगणवाडीत बालकांना जे पाकीटबंद अन्न दिले जाते, ते मुले खात नाहीत. या अन्नाचा दर्जा इतका खालावलेला आहे की, अनेकदा त्यात अळ्या सापडतात आणि अन्नाला दुर्गंधी येते. हे अन्न मुले फेकून देतात, अशा परिस्थितीत मुलांचे पोषण कसे होणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
खडसे यांनी आपल्या भाषणात सरकारवर थेट निशाणा साधला. “सरकारच्या या सर्व योजना केवळ कंत्राटदारांची पोते भरण्यासाठी आहेत का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
यावर उपाययोजना सुचवताना
“पूर्वीप्रमाणेच अंगणवाडीत ताजा आणि शिजवलेला सकस आहार देण्याची पद्धत पुन्हा सुरू करण्यात यावी. यामुळे स्थानिक स्तरावर बचत गटांना काम मिळेल आणि मुलांनाही दर्जेदार अन्न मिळेल,” असे एकनाथराव खडसे यांनी सुचवले
तसेच पाकीटबंद पावडर किंवा तयार अन्नाऐवजी मुलांना ताजी फळे, विशेषतः केळी, मोसंबी देण्यात यावीत, जेणेकरून त्यांच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतील, असेही खडसे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
अंगणवाडीतील आहारासोबतच शासनाच्या इतरही योजनांवर खडसे यांनी टीका केली. मग ती भांडी वाटपाची योजना असो वा इतर साहित्य पुरवठा, या सर्व योजनांमागे कंत्राटदारांचे हित जपले जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. “या योजनांचा नेमका फायदा कोणाला होतोय? बालकांना की कंत्राटदारांना?” असा रोकडा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला.





