संत तुकोबारायांच्या तपोभूमी रक्षणासाठी कोथळी येथे जाहीर सभेचा निर्धार
मुक्ताईनगर अतिक खान :
संत तुकोबारायांच्या पवित्र तपोभूमीच्या संरक्षणासाठी संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी स्थळ, श्रीक्षेत्र कोथळी (मुक्ताईनगर) येथील जुन्या मंदिरात संतभूमी संरक्षक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेला वारकरी संप्रदायातील भाविक, संतप्रेमी, इतिहास अभ्यासक व पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जाहीर सभेस संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संपर्कप्रमुख सचिन पाटील येरळीकर, ह.भ.प. उद्धव महाराज जुनारे, ह.भ.प. गुलाबराव महाराज, ह.भ.प. कृष्णा महाराज, श्री किरण महाजन, श्री रामदास उघडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या अध्यक्षस्थानी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख रविंद्र महाराज हरणे होते.
मार्गदर्शन करताना तुकया भक्त मधुसूदन महाराज यांनी तीव्र शब्दांत शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. देहूजवळील भामचंद्र, भंडारा व घोराडा डोंगर येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची साधना तपोभूमी सन २०११ मध्ये महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली असतानाही, लँड माफिया, बिल्डर व एमआयडीसीच्या माध्यमातून त्या पवित्र स्थळावर अतिक्रमण व अवैध उत्खनन सुरूच असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “२००७ पासून शासनाच्या आशीर्वादानेच तुकोबारायांच्या तपोभूमीचा विध्वंस सुरू आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा माधवी ताई यांनी उपस्थितांना आगामी आंदोलनाची सविस्तर माहिती देताना सांगितले की, संत तुकोबारायांच्या तपोभूमीवरील अतिक्रमण ही केवळ धार्मिक बाब नसून ती सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरणावर आलेली मोठी आपत्ती आहे. या अन्यायाविरोधात राज्यभर जनजागृती करून संघटित लढा उभारला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पुढील आंदोलनाचा आराखडा जाहीर करण्यात आला. ५ मार्च २०२६ रोजी देहू येथील बिजेला आल्यानंतर भामचंद्र डोंगरात मुक्काम, ६ मार्च २०२६ रोजी सकाळी भामचंद्र डोंगराची परिक्रमा करून दिंडीद्वारे १० मार्च २०२६ रोजी मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तसेच १० मार्चनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ५,००० वारकरी भाविकांच्या सहभागातून गाथा पारायणाचे आयोजन करण्यात येणार आहे.
जोपर्यंत शासन संत तुकोबारायांच्या तपोभूमी रक्षणाच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत “शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन” अखंडपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सभेच्या शेवटी संतभूमी रक्षणासाठी एकजूट होऊन लढा अधिक तीव्र करण्याचा ठाम संकल्प उपस्थितांनी केला.



